Tuesday, November 17, 2009

Olakh

गेल्या आठवड्यापासून मेली माझी दाढ दुखू लागली आणि आयुष्यात पहिल्यांदा मी दाताच्या डॉक्टरची पायरी चढले. रिसेप्शनमध्ये बसले होते, तर सहज नजर डॉक्टरांच्या डिग-यांच्या सटिर्फिकेटांवर गेली. त्यांचं पूर्ण नाव वाचून मी तर गारच पडले. नंदकिशोर प्रधान... म्हणजे आमच्या शाळेतल्या वर्गाचा हीरो. गोरा गोरा, उंचापुरा, कुरळ्या केसांचा राजबिंडा मुलगा. आता खोटं कशाला सांगू, माझ्यासकट त्या वर्गातली प्रत्येक मुलगी मरत होती नंदूवर. या वयात छातीची धडधड वाढलीच माझ्या...

... आत गेले आणि नंदूला पाहून चाटच पडले. डोक्यावरचे केस मागे हटले होते. लहानपणचे गोबरे गाल आता फुगून गोल गोल झाले होते. पोट सुटलं होतं. निळे डोळे चष्म्याआड झाकले गेले होते. तरीही त्याचा रूबाब कायम होता.

त्याने मात्र मला ओळखलं नव्हतं. तपासणी झाल्यावर मीच त्याला विचारलं, 'लहानपणी तुम्ही आपटे प्रशालेत होतात का?'

' हो.''

' दहावी कधी झालात? सिक्स्टी सिक्सला का?'

' अगदी बरोबर! पण, तुम्हाला कसं कळलं?'

' अहो, तुम्ही माझ्या वर्गात होतात,' सांगताना मी चक्क लाजलेच... !

... तर तो टकल्या, ढापण्या, ढोल्या, थेरडा नंद्या विचारतो कसा, “कोणता विषय शिकवायचात तुम्ही मॅडम!!!”

Tuesday, November 3, 2009

Hitchintak

हितचिंतक
----

एकदा मी माझ्या तंद्रीत चाललो होतो.एका वळणाशी येऊन पुढचे पाऊल टाकणार तोच मला आवाज आला,"थांब!! एक पाऊलही पुढे टाकू नकोस.वरची बाल्कनी तुझ्या डोख्यावर पडेल".मी थांबलो,अन काय आश्वर्य खरेच वरुन एक आख्खीच्या आख्खी बाल्कनी माझ्या पुढ्यात पडली.मी मागे वळून पाहिले,तिथे कुणीच नव्हते.आजूबाजूसही लोकं अपघात पहायला पुढे धावली होती.त्यात कुणीही माझ्याकडे पाहत नव्हता.

असेच काही दिवस गेले.मी रस्त्याने चाललो होतो.हातात हिने खरेदी केलेल्या कपड्यांच्या पिशव्या होत्या.ही बरीच मागे आपली पर्स सांभाळण्यात गुंतली होती.मी रस्ता क्रॉस करणार तोच मला पुन्हा त्यादिवशीचा आवाज ऐकू आला,"थांब,एक पाऊलही पुढे टाकू नकोस.एका ट्रकचा ताबा सुटलाय अन तो लाल दिवा तोडणार आहे".अन खरंच काही क्षणातच माझ्या समोर एक ट्रक भरधाव वेगाने सिग्नल तोडून गेला.
मी हडबडलो.तू कोण आहेस? मी जोरात म्हणअलो पण कुणीच उत्तर दिले नाही.पण तो आवाज मला माझ्या मनाचा वाटत होता.मी मनातच विचारलं,"तू कोण आहेस?"
तो म्हणाला,"तुझा मित्र,हितचिंतक,तुझ्या प्रारब्ध!"
मी डोळ्यात पाणी आणून म्हणालो,"थँक यू!"
तो जडावलेल्या स्वरात म्हणाला,"वेलकम"
मी रडत रडत प्रश्न केला,"खूप ऊशीरा भेटलास रे!,मी लग्न करताना कुठे होतास?"
तो रागात म्हणाला,"तो थेरडा भटजी माईकवर एवढ्या जोराजोरात मंगलाष्टके म्हणत होता की माझा आवाज तुझ्या कानांशी पोचण्या आधीच विरुन गेला!!!"