Wednesday, October 13, 2010

चिऊ-चिऊ दार उघड... An Un-narrated Love Story

एक होता काऊ अन्‌ एक होती चिऊ,

काऊचं घर होतं शेनाचं, चिऊचं घर होतं मेनाचं.

एके दिवशी काय झालं, खूप मोठ्ठा पाऊस आला.

त्यामुळे काऊचं शेनाचं घर पावसामध्ये वाहून गेलं.मग काऊ चिऊकडे आला आणि म्हणाला...

चिऊ-चिऊ दार उघड

चिऊ म्हणाली: थांब मझ्या लेकराला आंघोळ घालू दे

चिऊ-चिऊ दार उघड

...थांब मझ्या लेकराला साबण लावू दे

चिऊ-चिऊ दार उघड

...थांब मझ्या लेकराला...............

चिऊ-चिऊ दार उघड

...थांब मझ्या लेकराला...............

.

.

.

.

.

दिवस सरले, महिने सरले, दार काही उघडलं नाही

रात्रं-दिवस वाट बघण्याशिवाय, दुसरं काहीच घडलं नाही...

पावसाळा बेभान कोसळत रहिला, काऊ तसाच भिजत राहिला

चार-दोन पानांच्या आडोशाला, पंखात चोच खुपसून निजत राहिला...गार वाऱ्याच्या झुळका घेऊन मग हिवाळा आला,

काऊने त्याचा शेनाचा बंगला पुन्हा नव्याने सारवला...उन्हाळ्यात मात्र चिऊची तारांबळ उडाली,

मेनाची तिची झोपडी हळू-हळू वितळू लागली...

तेव्हा, पिलांच्या जीवाचे तिला भिऊ वाटले,

आधारासाठी तिने मग काऊचे घर गाठले...चिऊची चाहूल दूरूवरूनच त्याच्या कानावर पडली होती,

तिने हाक मारण्याआधिच काऊने दारं उघडली होती...

चिऊने कौतुकाने घराची पारख करून घेतली,

पिलांना मग काऊमामाची !!! ओळख करून दिली...

क्षणभरात काऊ खिन्न झाला, सुन्न झाला,

अन्न-धान्य आणतो सांगून भू‌‌र्र उडून गेला...सांज ढळली., अकाशातली एकएक चांदणीही विझून गेली,

वाट पाहून काऊची, मग चिऊही थकून निजून गेली...

ह्ळूवार पावलांनी - सावळ्या सावल्यांनी, तिच्या नकळत, रात्री तो आला...

गव्हाचे दाणे, आठवांचे गाणे, अलगद तिच्या चोचीत ठेवून, नेहेमीसाठी निघून गेला...

.

.

.

.

.

आषाढाचे घन पुन्हा दाटून आले., चिऊ तिच्या घरी परतली,

या पावसाळ्यात मात्र तिने कधिच दाराला कडी नाही घातली...

धुंद कोसळत्या पावसात, तिच्या कानी, ध्यानी-मनी, आता त्याचीच हाक घुमत असते.,

घनदाट काळ्या काळोखाच्या रात्रीही ती, त्या काळ्या काऊचीच वाट बघत बसते...