परवाचीच गोष्ट. माझ्यासोबत काम करणारी एक मुलगी (सॉरी, ऑफिसातली कलिग म्हणायला हवं. नाहीतर ह्यांच्या स्टेटसला आणि डिग्निटीला धक्का पोचतो) जेवायला बसताना हातात कसलातरी पांढऱ्या रंगाचा पुडा घेऊन आली. मी तिला सहज विचारलं, "काय गं, हा पुडा कसला?" त्यावर ती म्हणाली, "Hey, these are tissues, paper napkins!" "इतके? कँटिनमधल्या सगळ्या लोकांचे हात पुसणार आहेस की काय?", मी.
"Hmpfh..." - एक लाडिक अन् रागीट कटाक्ष - "I don't like to keep my hands oily all the while... आमच्या मेडला कित्तीदा सांगून ठेवलंय, don't use so much oil. पण तिला कळतच नाही! She just doesn't understand, you see?"
मी मनात म्हटलं, "बिच्चारी मेड, आता ही बया इंग्लिशमधून बोलल्यावर त्या बिचारीला काय कळणार? डोंबल!" पण हे माझ्या 'कलिग'ला सांगून काही फायदा नव्हता. कारण तिला मग बया म्हणजे कोण आणि डोंबल म्हणजे काय ते सांगावं लागलं असतं.
पुन्हा गंमत अशी की तिने काही सगळे 'पेपर नॅपकिन्स' वापरले नाहीतच. (खरंतर थोड्याशा चिडक्या आणि औपरोधिक सुरात) मी तिला उरलेल्या कागदांचं काय करणार असं विचारल्यावर म्हणते, "पँट्रीबॉय पिक करून डस्बिन मध्ये थ्रो करेल... डोंट वरी..."
काही दिवसांनी तिचा 'फास्ट' होता. मला म्हणाली, "ममाने 16 सोमवार्स करायला सांगितले आहेत. आज थर्ड आहे. माझ्यासोबत मॅक्डीमध्ये चल ना!" मी चमकलो. म्हटलं की ही 'मॅक्डी'मध्ये जाऊन काय करणार? त्यात मी डबा आणला होता.
"मॅक्डीमध्ये घरून आणलेलं काही खाता येतं का?"
"Yucks! So fool of you! इतके दिवस IT मध्ये असून तू इतका कसा रे बॅकवर्ड? Do you think McD's is a place like that? जाऊ दे. बकअप, मी खूप हंग्री आहे. Rats are running in my stomach like mad!!!"
"पण माझ्या डब्याचं काय करायचं?"
"तुझा टिफिन जाऊ दे बॅगमध्ये... वीऽल सी दॅट लेऽटर. मी तुझा लंच स्पॉन्सर करते."
तरी मी डबा घेऊनच निघालो. म्हटलं जाता जाता माय्क्रोवेववर गरम करूयात. संध्याकाळपर्यंत टिकेल. म्हणजे रात्रीच्या जेवणाचा प्रश्न मिटला.
तिचा 'फास्ट' असल्यामुळे तिने फ्रेंच फ्राइज़ (ह्याला मराठीत बटाट्याचे काप म्हणतात!) घेतले आणि मला बरीच भूक असल्यामुळे मी शाही फ्रँकी (ही म्हणजे आपली गुंडाळी पोळी... फक्त, मैद्याची) घेतली. मग तिकडच्या वेटरने अत्यंत अदबीने सॉस आणून दिला. इतकी अदब पाहून मला एकदम गुदमरल्यासारखं झालं. (आम्हाला आपली 'हाटेला'तल्या फडका मारणाऱ्या पोऱ्याची सवय. असे ब्रँडेड टी-शर्ट आणि स्वच्छ टोपी घालून चकचकीत ट्रेमध्ये काही 'पेपर नॅपकिन्स' आणि सॉस देणारी माणसे पाहिली की मला मी स्वतः इतका गबाळा वाटतो की विचारू नका.) माझी ती फ्रँकी खाऊन होत आली होती. ती आपली एकेक फ्रेंच फ्राय इतक्या नाजूकपणे तोंडात टाकत होती की तो हात तितक्याच नाजूकपणे आपल्या हातात यावा असं क्षणभर मला वाटून गेलं. पण तेवढ्यात आपण कोण आहोत, आपली ऐपत काय ह्याची जाणीव होताच, तिने एखाद्या झुरळाला जितक्या तत्परतेने झटकून द्यावे तितक्याच तत्परतेने मी तो मोहक विचार माझ्या मनातून झटकून टाकला...
मी तिला सहज म्हटलं, "ह्या शाही फ्रँकीचा ऐवज तसा बराच असूनही माझी भूक काही भागली नाही. आणि तुझं ह्या ४०-४५ फ्रेंच फ्राइज़ वर कसं निभावणार?"
"What is ऐवज?"
"ऐवज म्हणजे..." - मला पण प्रश्न पडला की 'ऐवज' ह्या शब्दाचं हिला कळेल असं काय भाषांतर करता येईल? - "ऐवज म्हणजे क्वांटिटी... ही शाही फ्रँकी तशी भरपूर होती तरी मला अजून थोडी भूक आहे आणि तुझं एवढ्याशा फ्रेंच फ्राइज़वर आवरलं?"
"Hey, it's more than enough... and man, today is my fast... ते काय आज्जीबाईसारखं स्वीटपटेटो वगैरे खात बसू काय? So many calories it gives!"
मला वाटलं की ह्या अशा कलरफुल मुलीने थोडंसं कॅलरीफुल खायला काय हरकत आहे. अंगापिंडाने थोडी तरी भरेल... (डोक्याने कधीही भरणार नाही याची खात्री आहे.)
जरा वेळाने आम्ही परत हापिसात जायला निघालो. सहज म्हणून तिला बिल विचारलं, "Why do you care? मी दिलेत ना!"
"अगं, तसं नाही. परत मी कधी एकटा किंवा दुसऱ्या कोणासोबत आलो जेव्हा मला बिल द्यायचं असेल तर साधारण अंदाज पाहिजे ना!"
"बरं! तुझी शाही फ्रँकी होती 105 ची आणि फ्रेंच फ्राइज़ होते 35 चे..."
माझी तर छातीच दडपली. १०५ रुपयांत एक गुंडाळी पोळी? आणि बटाट्याचे ४५ काप ३५ रुपयांचे? ह्या पोरीला आपण मस्तपैकी पेणचे पोह्याचे, बटाट्याचे आणि नाचणीचे पापड खायला घालूयात आणि विचारुयात की हे पापड बरे की तुझे फ्रेंच फ्राइज़? पण आपलं अशा (फ्रेंच फ्राइज़ वगैरे) बाबतीतलं मागासलेपण तिला दिसू नये म्हणून मी गप्प बसलो.
ऑफिसात आल्यावर विचार करत होतो, माणसाच्या हाती पैसा आला की सगळ्या जुन्या आणि तथाकथित 'मागास' गोष्टींशी त्याची नाळ तुटते का? पण झटक्यात एक गोष्ट लक्षात आली... अरे! मी पण ह्याच मुलीच्या ऑफिसमध्ये हिच्याच एवढा पगार घेतोय. आणि माझी तरी नाळ मी अजून शाबूत ठेवली आहे...