Wednesday, July 31, 2013

तुम्हाला विनोदबुद्धी कुठून मिळाली (पु.ल.देशपांडे नसती उठाठेव)

P.L. Deshpande


तुम्हाला विनोदबुद्धी कुठून मिळाली ?
ह्या प्रश्नाचे उत्तर मला सुचवणाऱ्‍याला मी इष्टेट लिहून देईल. मला वाड-वडिलार्जित फक्त आजपर्यंत संधिवात मिळाला आहे. आजीला दमा होता, त्या वाटणीची मी अत्यंत आतुरतेने वाट पाहात आहे. विनोदबुद्धी कोण देणार? ज्याने मला डोळे दिले (चष्मा वगळून- तो मी विकत घेतला.) त्याखेरीज ते दातृत्व मी आणखी कुणाच्या वाट्यावर जमा करू? गणितातला कच्चेपणा, मी माझ्या एका मामाकडून मिळवला. चित्रककलेतील अधोगतीला एक दूरचा चुलता जिम्मेदार आहे. सिग्रेटी फुंकायचे व्यसन माझ्या एका आतेभावाने लावले. इतिहासाचा तिटकारा इतिहासाच्याच गुरूजींनी निर्माण केला! त्यामुळे शिवाजीचा गुढगी रोग मी औरंगजेबापर्यंत नेऊन पोचवला आहे, आणि इंग्लंडच्या गादीवरच्या चार्लसबरोबर अनेक हेन्री मंडळींची मुंडकी तिमाही - सहामाहीत ह्या हाताने उडवली आहेत. संगीताची आवड ही शेजारच्या घरात वेळीअवेळी पेटी बडवणार्या एका इसमावर सूड म्हणून उत्पन्न करून घेऊन त्याची पेटी बंद पाडली. नाटकात पहिली भूमीका मिळाली, ती 'नरवीर तानाजी मालुसरे' ह्या नाटकाच्या सोनावणे मास्तरांनी 'डायरेक्शण' केलेल्या प्रयोगात! तानाजी मेल्यावर जे मावळे पळतात, त्यांतला आघाडीवरचा मावळा म्हणून मराठी रंगभूमीला माझा चिमुकला पदस्पर्श झाला. "मूर्खांनो! तो दोर मी केव्हाच कापला आहे," हे सूर्याजीचे भाषण ज्या मूर्खांना उद्देशून होते त्यातला मी आघाडीचा मूर्ख! तिथे देखील उजव्या विंगेत कड्याच्या दिशेला न पळता उदेभानाच्या महालाच्या दिशेला पळाल्यामुळे डाव्या विंगेत उभ्या असलेल्या सोनावणे मास्तरांनी उजव्याहाताने माझ्या डाव्या गालफडावर एक सणसणीत 'डायरेक्शन' केलेले स्मरते. जीव बालमुठीत धरून मी पुन्हा एकदा तलवार आणि मावळी पागोटे सांभाळीत उजव्या विंगेत पळताना वाटेत आडव्या पडलेल्या तानाजीच्या छातीवर पाय देऊन पळालो होतो. असो; हे विषयांतर झाले. विनोदबुद्धीचा उगम माझ्या मानेवरील चामखिळीप्रमाणे केव्हा झाला हे अजिबात स्मरत नाही! -- (पु.ल.देशपांडे नसती उठाठेव.)

Wednesday, July 10, 2013

बोलक्या रेषा (Bolkya Resha)






















समजत नाही कि मी घडलो कि बिघडलो

हुशारी मिळवताना शहाणपण विसरलो
तंत्रज्ञानामागे धावताना आत्मज्ञान विसरलो
पैसा हीच शक्ती समजून ईश्वरभक्ती विसरलो
समजत नाही की मी घडलो की बिघडलो

...
सुख शोधताना जीवनाचा बोध विसरलो
सुखासाठी साधने वापरताना साधना विसरलो
भौतिक वस्तूच्या सुखात नैतिकता विसरलो
समजत नाही की मी घडलो की बिघडलो

धन जमा करताना समाधान विसरलो
तंत्रज्ञान शोधताना ते वापरण्याचे भान विसरलो
परिक्षार्थी शिक्षणात हाताचे कौशल्य विसरलो
समजत नाही की मी घडलो की बिघडलो


टी.व्ही. आल्यापासून बोलणं विसरलो
जाहिरातीच्या मार्यामुळे चागलं निवडणं विसरलो
गाडी आल्यापासून चालणं विसरलो
समजत नाही की मी घडलो की बिघडलो

मोबाईल आल्यापासून भेटीगाठी विसरलो
कॅलक्युलेटर आल्यापासून बेरीज विसरलो
संगणकाच्या वापराने विचार करणं विसरलो
समजत नाही की मी घडलो की बिघडलो

संकरीत खाल्यामुळे पदार्थांची चव विसरलो
फास्टफूडच्या जमान्यात तृप्तीचे ढेकर विसरलो
.सी. मध्ये बसून झाडाचा गारवा विसरलो
समजत नाही की मी घडलो की बिघडलो

परफ्युमचा वापरामुळे फुलांचा सुगंध विसरलो
चातुर्य मिळवताना चरित्र विसरलो
जगाचा भूगोलात गावाचा इतिहास विसरलो
समजत नाही की मी घडलो की बिघडलो

बटबटीत प्रदर्शनात सौंदर्याचे दर्शन विसरलो
रिमिक्सच्या गोंगाटात सुगमसंगीत विसरलो
मृगजळामागे धावताना कर्तव्यातला आनंद विसरलो
समजत नाही की मी घडलो की बिघडलो

स्वतःमध्ये मग्न राहून दुस-‍याच्या विचार विसरलो
सतत धावताना क्षणभर थांबणं विसरलो
जागेपणी सुख मिळवताना सुखानं झोपणं विसरलो
समजत नाही की मी घडलो की बिघडलो.