Showing posts with label Health and Life. Show all posts
Showing posts with label Health and Life. Show all posts

Sunday, April 19, 2015

चाळीशी शांत - एक सुंदर लेख

चाळीशी शांत


‘…नक्की यायचं ! ’
आमंत्रण पत्रिकेची शेवटची ओळ वाचून पत्रिका बाजूला ठेवली.
‘हा माणूस काय करेल ना !’ मी हळूच पुटपुटलो.
‘काय झालं?’ सौ ने विचारलं.
मी पत्रिका दाखवली. ती वाचून सौ ने हाताच्या ऐवजी अख्खी पत्रिकाच स्वतःच्या कपाळावर मारली.
‘आग्रहाने बोलावलंय आपल्याला. जावंच लागेल.’ थोडं कंटाळतच मी म्हटलं.
‘हा कुठला मित्र तुझा ? यापूर्वी कधी ऐकलं नव्हतं याच्याबद्दल.’ सौ ने सफाईने विषय बदलला.
तात्याबद्दल किती सांगायचं? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे – हिला – काय काय सांगायचं?
मित्रांची एक मजा असते. आपल्या घरच्या मंडळींसाठी ते पाण्यावरील हिमनगासारखे असतात. पाण्याखालचे ‘नऊ दशांश’ ते फक्त आपल्यालाच माहित असतात. घरच्या मंडळींसमोर आपल्या मित्रांना ‘सेन्सॉर’ करत करत आपण कसे ‘प्रोजेक्ट’ करतो, ही तुमच्या मैत्रीची कसोटी असते. तात्याला ‘तात्या’ म्हणावं असं काही त्याचं वय नव्हतं. माझ्यापेक्षा फार फार तर दोन-तीन वर्षांनी मोठा असेल. शिक्षणावरील प्रेमापोटी तो विविध बॅचेस मधल्या मुलांचा ‘क्लासमेट’ होता. पण त्याचा एकंदरीत वावर, बोलण्याची शैली, कुठल्याही विषयावर अधिकारवाणीने बोलण्याचा त्याचा प्रगाढ आत्मविश्वास पाहिला की त्याला ‘तात्या’ ही उपाधी दिलेल्या माणसाला वंदन करावेसे वाटे. स्वतःच्या आजोबांपेक्षाही ‘चार पावसाळे’ जास्त पाहिले असल्याच्या अविर्भावात तो कुणालाही कुठल्याही विषयावर सल्ले द्यायचा. अर्थशास्त्रातील ‘Inelastic demand’ ची संकल्पना शिकताना, आम्ही सिगारेटच्या किमतीचं उदाहरण घोकत असताना तात्या ‘चेन स्मोकर’ झाला होता. अतिशय बेदरकार आयुष्य जगणाऱ्या तात्याला कॉलेजमध्ये असतानाच विविध व्यसने लागली होती – नव्हे – तर त्या व्यसनांना आता तात्या लागत होता. कॉलेज वगैरे संपल्यावर अनेक धंदे करून तो ‘बिल्डर’ वगैरे झाला होता, असं कानावर पडलं होतं. त्यानंतर त्याचा काही पत्ता नव्हता…..आणि अचानक ही पत्रिका हातात पडली.
सभागृहात अनेक मंडळी. काही ओळखीचे, काही अनोळखी तर काही ओळखीचे अनोळखी ! माझी नजर तात्याला शोधत होती. तात्या कुठे दिसत नव्हता. सभागृहातील स्टेजवर एक टेबल, दोन खुर्च्या. मागील भिंतीवर एक मोठा बॅनर. त्यावर – ‘तुमच्या तात्याची चाळीशी शांत !’ हे शब्द. एक तरुण स्त्री सर्वांचं हसून स्वागत करत होती. ही तात्याची ‘ताती’ असावी असं गृहीत धरून मी आणि सौ तिच्याजवळ गेलो. नमस्कार करून माझं नाव सांगितलं. तात्याची चौकशी केली. माफक हसून ‘ते येतील इतक्यात’ असं म्हणत ‘ताती’ घोळक्यात मिसळली. तात्याच्या घरात मी ‘पाण्यावरील हिमनगाइतका’देखील माहित नव्हतो, त्याबद्दल मी तात्याचे मनोमन आभार मानले. इतर जुने मित्र भेटले. त्यांच्याशी बोलत उभा होतो आणि अचानक जल्लोष आणि टाळ्या ऐकू आल्या. आम्ही सगळ्यांनी स्टेजकडे पाहिलं. नेत्याप्रमाणे सगळ्यांना मानवंदना देत तात्या स्टेजवर आला होता.
डोक्यावर नसलेल्या केसांमुळे आता तो खरा ‘तात्या’ वाटत होता. तो एक फरक सोडला तर भूत आणि वर्तमान यात फारशी तफावत नव्हती.
‘इथे जमलेल्या माझ्या तमाम ‘निकम्म्या’ मित्रांनो आणि माझ्या ‘शुंदर शुंदर’ मैत्रिणींनो,….
‘निकम्म्या’ आणि ‘शुंदर’ जल्लोषाने सभागृह भरून गेलं ! तात्या जराही बदलला नव्हता, या स्वतःच्या समाधानालाच प्रत्येकाने सलामी दिली होती.
‘रविवारी ढांगा वर करून झोपायचे सोडून तुम्ही आत्ता या हॉलमध्ये का आहात, हे मी सांगत नाही. कारण ते सांगितलं तर तुम्हाला पाठवलेल्या आमंत्रण पत्रिकेच्या छपाईचा आणि पोस्टाचा असा सगळा खर्च फुकट जाईल. पण तरी सांगतो ! तर आज, तुमचा हा ‘तात्या’ चक्क आणि अखेरीस ‘चाळीस’ वर्षांचा झाला. ‘चक्क’ यासाठी म्हटलं कारण मी स्वतःला अजूनही ‘चाळीस’ वर्षांचा मानत नाही. आता ‘अखेरीस’ का म्हटलं ते त्याहून जास्त महत्वाचं आहे. गेल्याच वर्षी मी स्वर्गाची बेल वाजवून खाली आलोय…’
…तात्याच्या एकेका वाक्यानिशी उसळी मारणारं सभागृह आता अचानक गंभीर झालं.
‘…कम ऑन ! इतके सिरीयस होऊ नका. मागल्या वर्षी छातीत कळ येऊन गेली. तसे कॉलेजमध्ये असताना ‘छातीत कळ’ यायचे प्रसंग खूप आले. पण यावेळची कळ जरा जास्तच जीवघेणी होती. आपल्या त्या ‘इंदू’ सारखी. ती आल्ये आज? वेल, इट वॉज अ हार्ट अॅटॅक ! मी स्ट्रेचरवर असताना कांचनला म्हटलं, बहुतेक जायची वेळ आली. पण चुकून माकून वाचलोच तर माझी ‘चाळीशी शांत’ करून टाकायची ! कारण यापुढे आपली साठी शांत, पंचाहत्तरी वगैरे होईल की नाही याचा काही नेम नाही ! म्हणून हे सेलिब्रेशन ! बट लेट मी टेल यु वन थिंग. आयुष्यात खूप व्यसनं केली, पण पैसा कमवायची नशा खूप लवकर मिळाली. सकाळी उठल्यापासून ‘पेटी आणि खोके’ यांच्याच गप्पा ! या सगळ्या धावपळीत ‘हेल्थ’कडे सॉलिड दुर्लक्ष झालं. ‘आपल्याला काय होणार नाही’ या मस्तीत बॉडीला वाट्टेल तसा झिजवत राहिलो. वेळी अवेळी खाणं, शून्य व्यायाम, कामाचा स्ट्रेस, दारू, स्मोकिंग ! मी वाईट शब्द वापरतोय, माफ करा – माझ्या हेल्थवर रोज ‘रेप’ होत होता. शेवटी सहन न होऊन,एका रात्री मग बॉडीने माझ्या छातीचा दरवाजा जोरजोरात वाजवला ! आय टेल यु, आपली सॉलिड फाटली ! डायरेक्ट अॅडमिट ! मग बायपास ! डॉक्टर म्हणाले, लकी आहात म्हणून वाचलात. आता यापुढे जगायचं असेल तर मी सांगतो ते करायचं. फ्रेंड्स, मी तुमच्यातल्या अनेकांना आत्ता बघतोय. तुमच्यावरच्या प्रेमापोटी एक सांगतो. वेळीच सुधारा स्वतःला. मी जे भोगलं ते तुम्हाला भोगायला लागू नये म्हणून हे सगळं सांगितलं. आजचा मेन्यू पण एकदम वेगळा आहे. सॉरी टू से, बट नो ड्रिंक्स टुडे. आय होप, यु विल स्टील एन्जॉय द पार्टी !’
टाळ्यांच्या आतषबाजीत तात्या स्टेजवरून खाली आला. माझ्यासमोर आला तेव्हा मी त्याला घट्ट मिठी मारली. काही क्षण आम्ही फक्त एकमेकांकडे बघत राहिलो. ‘चलता है यार’ असं काहीतरी म्हणून तात्या जोरात हसला. मी माझ्या पत्नीची ओळख करून दिली.
‘मागच्या वेळी भेटलेलास तेव्हा वेगळी होती कोणीतरी !’ तात्या आपल्या नेहमीच्या फॉर्मात येत म्हणाला.
तात्याच्या या अनपेक्षित बाउन्सरपुढे बावळटपणे हसून वेळ मारून नेणं इतकंच माझ्या हातात होतं. तात्या स्वतःच्या विनोदावर बेहद्द खूष होत हसला. स्वतःच्या विनोदाने समोरचे निष्प्रभ वगैरे झालेले बघून त्याला एक आसुरी आनंद होत असे. तात्याचा हा ‘पीळ’ अजून तसाच होता.
कार्यक्रम संपल्यावर आम्ही जायला निघणार इतक्यात एक जण म्हणाला, ‘अरे, तुझ्याजवळच हे जाधव सर राहतात. त्यांना घरी सोडशील का?’
आम्ही गाडीत बसलो. जाधव सर माझ्या शेजारी. पत्नी मागच्या बाजूस. काहीतरी विषय काढायचा म्हणून मी जाधव सरांना त्यांच्याबद्दल विचारलं.
‘मी जाधव. तात्याचा फिटनेस ट्रेनर. असे बघू नका ! माझ्या वयावर जाऊ नका. पांढऱ्या केसांवर जाऊ नका. माझं अख्खं आयुष्य लोकांना व्यायाम शिकवण्यात गेलंय. पुढल्या वर्षी पंच्याहत्तर होईन. पण तुमच्यासारखे तरुण लोक खूप येतात हल्ली. सगळ्यांची पोटं सुटलेली. व्यायाम करायला वेळ नाही म्हणतात. कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त वजन कमी करून द्या सांगतात. वाट्टेल तितके पैसे द्यायला तयार असतात. मला तुमच्या पिढीची मोठी गंमत वाटते. आधी पैसे मिळवायला स्वतःची तब्येत खर्च करायची; आणि मग गेलेली तब्येत परत मिळवायला पैसे खर्च करायचे ! मी तरुणांना नेहमी दोन तीन गोष्टी सांगतो. एक म्हणजे, स्वतःसाठी व्यायाम कराच. पण त्याहूनही, तुमच्या मुलांवर तुमचं प्रेम असेल तर तुम्ही निरोगी आयुष्य जगलं पाहिजे. दुसरं म्हणजे, व्यायामाची ती प्रोसेस एन्जॉय करा. रिझल्ट्स आपोआप येतील. आणि तिसरं म्हणजे, तुम्ही भले पैसे कमवाल, गाडी घ्याल, बंगला घ्याल. पण ते उपभोगायला तुमची तब्येत चांगली नसेल तर काय उपयोग ?….जाधव सर उतरता उतरता मिश्कील स्वरात म्हणाले, ‘हे शरीर काही वर्षांसाठी आपल्याला भाडे तत्वावर राहायला दिलंय. मग ही ‘जागा’ सोडताना, होती तश्शी परत केली तर‘मूळ मालकाला’ ते जास्त आवडेल, नाही का?’
जाधव सरांसोबतच्या गप्पा, तात्याची ‘चाळीशी शांत’ वगैरे मनात खूप काळ रेंगाळत राहिलं. त्याचं दरम्यान एक छोटंसं पुस्तक वाचनात आलं. ‘What the most successful people do before breakfast’ असं नाव असलेल्या पुस्तकात जगातील सर्व यशस्वी लोकांच्या चांगल्या सवयींचा एक ‘लसावि’ काढलाय. ही सगळी माणसं आपल्या व्यस्त दिनचर्येतून व्यायामासाठी ‘एक तास’ बाजूला काढतात हे लक्षात आलं. ते सगळं वाचून जेव्हा ह्या सर्व अतिव्यस्त लोकांच्या समोर स्वतःला पाहिलं तेव्हा कससंच वाटलं. लोकमान्य टिळकांनी,म्हणे, स्वतःची तब्येत कमवायला एक वर्षांचा ‘ब्रेक’ घेतला होता तेही अचानक आठवलं. माझ्यावर अवलंबून असलेले आणि माझ्यावर प्रेम करणारे सगळे चेहरे आठवले. त्यांच्यावरील प्रेम मी वेगळ्या पद्धतीने व्यक्त करू का ?
एक तारीख, सोमवार वगैरे कुठलेही मुहूर्त न बघता व्यायामाला सुरुवात केलीय. खाण्याच्या सवयी बदलायला सुरुवात केलीय. ‘मिताहार’ हा एक जादुई शब्द आयुष्यात आलाय. याच दिशेने ‘धडपडणाऱ्या’ मित्र-मैत्रिणींचा एक what’s app ग्रुप बनवलाय. एकमेकांशी रिकाम्या गप्पा मारण्याऐवजी आम्ही रोज सकाळी एकमेकांना व्यायाम करायला उद्युक्त करतो, एकमेकांचे (फक्त सकारात्मक) अनुभव शेअर करतो. आता व्यायाम करताना शरीरातील एकेक स्नायू-न-स्नायू आपल्याशी संवाद साधतोय, हे लक्षात येतं. खूप चालून थकल्यावर, ‘जोर’ मारताना ताकद संपते तेव्हा जुन्या सवयींमध्ये ठाण मारून बसलेली चीज, बटर, साखर वगैरे भूते अचकट-विचकट हसतायत असा भास होतो. त्यांना न जुमानता प्रयत्न सुरु आहेत….
स्त्रियांची स्मरणशक्ती किती दांडगी असते. त्या दिवशी व्यायाम करून घरी आलो. मी आंघोळीला जाणार तितक्यात बायकोने विचारलं –
‘बाय द वे, तात्याला आधी भेटलेलास तेव्हा तुझ्याबरोबर कोण होती ?’
‘अगं, ती माझीच एखादी जुनी वाईट सवय असेल !’
बायको फक्त गोड हसली.
-
WhatsApp वर आलेला लेख. याचा लेखक अज्ञात आहे. लेखकाच्या वाचनात हि पोस्ट आल्यास कळवणे म्हणजे याचे श्रेय देता येईल.