गेल्या आठवड्यापासून मेली माझी दाढ दुखू लागली आणि आयुष्यात पहिल्यांदा मी दाताच्या डॉक्टरची पायरी चढले. रिसेप्शनमध्ये बसले होते, तर सहज नजर डॉक्टरांच्या डिग-यांच्या सटिर्फिकेटांवर गेली. त्यांचं पूर्ण नाव वाचून मी तर गारच पडले. नंदकिशोर प्रधान... म्हणजे आमच्या शाळेतल्या वर्गाचा हीरो. गोरा गोरा, उंचापुरा, कुरळ्या केसांचा राजबिंडा मुलगा. आता खोटं कशाला सांगू, माझ्यासकट त्या वर्गातली प्रत्येक मुलगी मरत होती नंदूवर. या वयात छातीची धडधड वाढलीच माझ्या...
... आत गेले आणि नंदूला पाहून चाटच पडले. डोक्यावरचे केस मागे हटले होते. लहानपणचे गोबरे गाल आता फुगून गोल गोल झाले होते. पोट सुटलं होतं. निळे डोळे चष्म्याआड झाकले गेले होते. तरीही त्याचा रूबाब कायम होता.
त्याने मात्र मला ओळखलं नव्हतं. तपासणी झाल्यावर मीच त्याला विचारलं, 'लहानपणी तुम्ही आपटे प्रशालेत होतात का?'
' हो.''
' दहावी कधी झालात? सिक्स्टी सिक्सला का?'
' अगदी बरोबर! पण, तुम्हाला कसं कळलं?'
' अहो, तुम्ही माझ्या वर्गात होतात,' सांगताना मी चक्क लाजलेच... !
... तर तो टकल्या, ढापण्या, ढोल्या, थेरडा नंद्या विचारतो कसा, “कोणता विषय शिकवायचात तुम्ही मॅडम!!!”