Sunday, December 14, 2014

'मार्क' म्हणजेच गुणवत्ता नाही! - सूज्ञ पालकांसाठी डोळे उघडणारा झणझणीत लेख

'मार्क' म्हणजेच गुणवत्ता नाही!

अतिशय सुरेख आणि सूज्ञ पालकांसाठी डोळे उघडणारा झणझणीत लेख: 
डॉ. अरुण नाईक, 
(मानसोपचारतज्ञ) -


नुकतीच एक बातमी वाचली....
नेहमी चांगले मार्क मिळवणाऱ्या
मुलीला दहावीचा पहिला पेपर चांगला नाही गेला. संध्याकाळी
तिने आत्महत्या केली. अजून
परीक्षाही संपली नाही.
पण मुलगी संपली.
मागे एका
मेडिकलच्या विद्यार्थ्यांने
शेवटच्या वर्षांला गोल्ड मेडल ऐवजी सिल्वर मेडल मिळाले,
म्हणून आत्महत्या केली होती.
माणूस मरायला घाबरत नाही, पण किंमतशून्य जगायला
घाबरतो.
एका नामांकित
शाळेच्या स्कॉलर वर्गातील
मुलांशी बोलताना मी त्यांना विचारले की,
"सर्वजण त्यांना
काय म्हणतात?"
मुले म्हणाली,
की 'स्कॉलर'.
मी विचारले 'का?',
मुले म्हणाली,
कारण आम्हाला
चांगले मार्क मिळतात.
मी समीकरण मांडले.
'अ = ब'

'ब = क'
त्याअर्थी 'अ = क'.
म्हणजेच,
'मी = स्कॉलर'

'स्कॉलर = मार्क'.
याचा
अर्थ 'मी = मार्क'.
जेव्हा आपण आपली किंमत मार्कावरून करायला लागतो,
तेव्हा जरा मार्क कमी मिळाले की,
आपली किंमत कमी झाली
असे वाटते.
सर्व परीक्षा बोर्डानी
मार्क वाटायला सुरुवात
केल्यापासून तर हे समीकरण पालक व मुले यांच्या डोक्यात
गच्च बसायला लागले आहे.
हे धोकादायक आहे....
माझी भाची शाळेतही जात
नसताना तिने काढलेल्या एका
चित्राला मी 'वा' म्हटले.
ती
लगेच म्हणाली-मार्क दे.
मी चित्राच्या बाजूला लिहिले 'छान'.
ती म्हणाली मार्क दे. शंभरपैकी.
अडूनच बसली.
शाळेत जायच्या आधीपासूनच हे
डोक्यात शिरत आहे. हे
आजूबाजूच्या वातावरणात आहे.
या विषारी वातावरणाने वरील
बळी घेतले आहेत.
जेव्हा
कधी पालकांना विचारले की,
तुमच्या मुलांबाबत काय व्हावे असे तुम्हाला वाटते? तेव्हा
हमखास उत्तर येते की,
तो चांगला नागरिक बनावा, चांगला माणूस बनावा.
जरा विरोधाभास
पाहूया...
मेडिकलच्या विद्यार्थ्यांशी
बोलताना त्यांनी सांगितले की
त्यांना चांगला डॉक्टर बनायचे आहे.
मी विचारले चांगला
डॉक्टर कोणाला म्हणता? तर
मुले म्हणाली की,
जो जास्तीत जास्त लोकांना चांगल्यात चांगला उपचार
देऊन बरा करतो तो. सिल्वर
मेडल मिळालेल्या त्या
मेडिकलच्या विद्यार्थ्यांलाही चांगला डॉक्टर बनायचे असेल
ना?
पण बनला का?
त्याच्या आधीच गेला.
चांगला नागरिक,
चांगला माणूस, चांगला डॉक्टर व चांगला व्यावसायिक आपण
जेव्हा काहीतरी चांगले करतो
तेव्हा बनतो. नुसत्या मार्कानी नाही बनत.
एका नववीतील
मुलीला चाचणी परीक्षेत
गणितात वीसापैकी १४ मार्क
मिळाले म्हणून तिने आत्महत्येचा
प्रयत्न केला. माझ्याशी बोलताना तिचे पहिले वाक्य होते की,
'आय एम युझलेस'.
या मुलीला
दहावीनंतर क्रीडा पत्रकार
बनायचे आहे. त्यासाठी ती
कलाशाखेला जाणार आहे.
मी विचारले की आर्ट्सला गणित असते का?
ती म्हणाली 'नाही'.
मी म्हटले की याचा अर्थ तू
दहावी नंतर गणिताला टाटा
करणार,मग तू गणितासाठी
जीव का देत होतीस?
हे ऐकल्यावर तिलाही हसू आले.
काय आहे की 'गुणी मुलगी',
'भावंडात हुशार मुलगी',
'सर्वाची आवडती',
'९०% मिळायला हवेत हं'. या इतरांच्या
मनातील प्रतिमेला जपण्याचे तिला दडपण आले होते.
ही प्रतिमा आपण जपू शकलो नाही तर आपण युझलेस....!
मुलांमध्ये खूप क्षमता असते,
परंतु मार्कावर लक्ष केंद्रित
केल्यामुळे त्या क्षमतांना
'किंमत' दिली जात नाही.
आज जग जवळ आले आहे. अनेक शक्यता निर्माण झाल्या आहेत.
पालकांनी लक्षात घ्या की, हे लक्षात न आल्यामुळे जेव्हा
मुलांना कमी मार्क मिळतात
तेव्हा आपण नकळत हिंसक होतो.
मुलांच्या आत्मविश्वासावर
घाला घालतो. मार्कावरून
मुलांची किंमत किंवा लायकी ठरवू नका.
आपण जन्माला
आलो ही एकच गोष्ट आपण
जगायला लायक आहोत
यासाठी पुरेशी आहे.
आता
जगताना काय करायचे याचा विचार करूया.
'थ्री इडियट'
सिनेमातील मुलाखतीच्या
प्रसंगात आजवर मार्कावरून
आपली किंमत ठरवणारा,
घाबरणारा मुलगा म्हणतो
'जिंदगी में कुछ तो ठीकठाक .कर ही लूंगा'..
हा आत्मविश्वास मुलांना द्या!
अवडली तर नक्की शेयर करा...!
तुमचा हा संदेश कीत्तके पालक आणी विद्यार्थ्याचे मनपरिवर्तन करु शकतो...

Wednesday, December 3, 2014

A nice marathi Story- जगणे (प्रा) अनलिमिटेड ! by Navin Kale

प्रत्येकाने वाचावा असा नविन काळेंचा अप्रतिम लेख !

जगणे (प्रा) अनलिमिटेड !

पोस्ट जरा मोठी आहे पण जरुर वाचा..बघा काही फरक पडतोय का आपल्या आयुष्यात...

             दोन दिवसांपूर्वीची गोष्ट. कुटुंबासह कुठल्यातरी मॉलमध्ये होतो. मुलगा ‘प्ले झोन’ मध्ये, सौ. (विन्डो) शॉपिंगमध्ये आणि मी एसीची छान गार हवा अंगावर घेत एका कोपऱ्यात पेपर वाचत बसलो होतो. पेपर खरं तर, नावाला. माणसं वाचत बसलो होतो. विविध चेहऱ्यांची, आकारांची माणसं जणू ‘आज जगाचा शेवटचा दिवस असावा’ असे भाव आणून शॉपिंग करत होती. (एवढ्या वस्तू विकत घेऊन माणसं त्या वस्तू घरात कुठे ठेवतात, हा मध्यमवर्गीय प्रश्न मला कायम सतावतो.असो.)
माझं ‘माणसं-वाचन’ चालू असतानाच माझ्या शेजारी एक तरुण येऊन बसला. जेमतेम चाळीशीचा असावा. जीन्स आणि खोचलेला टी शर्ट. पायात बूट. अंगावर ब्रुट. हातात मराठी पुस्तक. खिशातला शुभ्र रुमाल काढून त्याने कपाळावरचा घाम पुसला. रुमालाची (होती तशी) व्यवस्थित घडी घातली आणि (त्याच) खिशात ठेवली. त्याच्या हालचाली शांत झाल्यावर त्याने पुस्तक उघडले. ते पुस्तक माझ्या आवडत्यांपैकी एक होतं. न राहवून मी म्हटलं, ‘मस्त पुस्तक आहे.’ त्याने माझ्याकडे बघत हसून मान हलवली.
पाच एक मिनिटांनी तो माझ्याकडे वळून म्हणाला,’वाचन आवडतं?’
‘प्रचंड. रीडिंग इज माय ‘फर्स्ट लव्ह’.’ आजूबाजूला ‘सौ’ नाही हे बघत मी म्हटलं.
‘किती वाचता रोज?’
‘रोज असं नाही…अं.. अं…काही खास ठरवलेलं नाही. इच्छा झाली की वाचतो.’ अनपेक्षित योर्करला कसंबसं खेळत मी म्हटलं.
‘खायला आवडतं?’ कॉन्जीक्युटीव्ह योर्कर.
‘प्रचंड. इटिंग इज माय ‘सेकंड लव्ह’.’
‘हो? मग रोज जेवता की इच्छा होईल तेव्हा….?’
‘नाही नाही…रोज दोन वेळा..आणि मधे-मधे काहीना काही खादाडी चालू असतेच.’ हिट विकेट !
तो तरुण हसला. म्हणाला, ‘मी दिवसभरात एक तास वाचतो. वाचल्याशिवाय झोपत नाही. आंघोळ, जेवण..तसंच वाचन !’
‘बरा वेळ मिळतो तुम्हाला.’ दयनीय चेहरा करत मी म्हटलं.
‘वेळ मिळत नाही. मी काढतो. ‘वेळ’ ही जगातली सगळ्यात ‘टेकन फॉर ग्रान्टेड’ गोष्ट आहे असं मी मानतो. फॉर दॅट मॅटर, आयुष्यच घ्या ना ! फारच गृहीत धरतो आपण आयुष्याला ! ‘मी रिटायर झाल्यावर भरपूर वाचन करणारे’ असं कोणी म्हटलं ना, की माझी खात्री आहे, नवज्योत सिंग सिद्धूसारखा रेड्यावर हात आपटत तो ‘यम’ हसत असेल !’
मी हसलो. तसा किंचित गंभीर होत त्याने विचारलं, ‘तुम्ही कधी पाहिलंय यमाला?’
मी आणखी हसू लागलो.
‘आय अॅम प्रीटी सिरीयस. तुम्ही पाहिलंय यमाला ? मी पाहिलंय. दोन वर्षांपूर्वी. रस्ता क्रॉस करत होतो. समोरून भरधाव गाडी आली. त्या दिव्यांच्या प्रकाशझोतातही मी अंधार पाहिला. त्या दोन सेकंदात मला ‘मृत्यूने’ दर्शन दिलं. त्यानंतर जागा झालो तो हॉस्पिटलमध्येच. गंभीर इजा होऊन सुद्धा मी कसाबसा वाचलो होतो. हॉस्पिटलमधून घरी आलो तो नवा जन्म घेऊन. मी ‘देव’ पाहिला नव्हता पण ‘मृत्यू’ पाहिला होता. मृत्यू तुम्हाला खूप शिकवतो. माझी मृत्यूवर श्रद्धा जडली. आजूबाजूला रोज इतके मृत्यू दिसत असूनही ‘मी’ अमर राहणार असं ज्याला वाटतं, तो माणूस ! तुम्हाला माहितीय, माणूस मृत्यूला का घाबरतो?’
‘अर्थात ! मृत्यूनंतर त्याचे सगे सोयरे कायमचे दुरावतात. मृत्यूमुळे माणसाच्या इच्छा अपूर्ण राहतात.’ मी म्हटलं.
‘साफ चूक ! माणूस यासाठी घाबरतो कारण मृत्यूनंतर ‘उद्या’ नसतो !
‘मी समजलो नाही.’
‘प्रत्येक काम आपल्याला ‘उद्यावर’ टाकायची सवय असते. वाचन, व्यायाम, संगीत ऐकणे…गंमत म्हणजे, आहेत ते पैसे देखील आपण ‘आज’ उपभोगत नाही. ते कुठेतरी गुंतवतो. भविष्यात ‘डबल’ होऊन येतील म्हणून ! या ‘उद्या’ वर आपला फार भरवसा असतो. मग तो आपल्या जगण्याचा एक भाग बनतो. आपण मृत्यूला घाबरतो कारण मृत्यू तुम्हाला हा ‘उद्या’ बघायची संधी देत नाही ! मृत्यू म्हणजे – आहोत तिथे, आहोत त्या क्षणी फुल स्टॉप ! खेळ ऐन रंगात आला असताना कुणीतरी येऊन तुम्हाला खेळाच्या बाहेर काढावं, तसा मृत्यू तुम्हाला या जगातून घेऊन जातो. तुमच्यावरील या ‘अन्याया’विरुद्ध आवाज उठवायला देखील तुम्ही उरत नाही..माझ्या मृत्यूनंतर मी माझा लाडका ‘उद्या’ पाहू शकणार नाही, या हतबलतेला माणूस सगळ्यात जास्त घाबरतो. म्हणून हॉस्पिटलमधून घरी आल्यावर ठरवलं, यापुढचं आयुष्य उघड्या डोळ्यांनी जगायचं. इतके दिवस जेवण नुसतंच ‘गिळलं’. या पुढे एकेका घासाचा मजा घ्यायचा. आयुष्याची ‘चव’ घेत जगायचं. ’
‘म्हणजे नक्की काय केलं?’माझी उत्सुकता आता वाढली होती.
‘माझ्या आयुष्याची जबाबदारी मी स्वतःवर घेतली. मी माझ्या आयुष्याचा Chief Executive Officer झालो !’
‘कंपनीचा सीईओ इतपत ठीक आहे. आयुष्याचा ‘सीईओ’ वगैरे…जरा जास्तच होत नाही का?’ मी विचारलं.
‘वेल…तुम्हाला काय वाटतं हे माझ्यासाठी महत्वाचं नाही. आयुष्य कसं जगायचं याचे नियम मी ‘माझ्यापुरते’ केलेत. त्यामुळे…’
‘मग..तुमच्या कंपनीत किती माणसं आहेत?’ त्याला मधेच तोडत, मस्करीच्या सुरात मी विचारलं.
‘म्हटलं तर खूप, म्हटलं तर कोणीच नाही.’ तो खांदे उडवत म्हणाला.
मला न कळल्याचं पाहून तो पुढे बोलू लागला. ‘मी फक्त माझ्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स सोबत डील करतो. दे व्हर्च्युअली कंट्रोल माय लाईफ.
माझ्या बोर्डवर विविध माणसे आहेत. फरहान अख्तर, आमीर खान, शिवाजी महाराज, अब्दुल कलाम, चार्ली चॅप्लीन, गांधीजी, अमिताभ, हेलन केलर, जे आर डी टाटा…..’
माझ्या चेहऱ्यावरील बदलत जाणारे भाव न्याहाळत त्याने आणखी काही नावे घेतली.
‘या लोकांबद्दल वाचलं तेव्हा एक लक्षात आलं. या प्रत्येकामध्ये काहीना काही वैशिष्ट्य आहे. काही क्वालिटीजमुळे मला ही माणसं ग्रेट वाटतात. मी काय करतो…अं…उदाहरण देतो…समजा खोटं बोलण्यावाचून पर्याय नाही अशा परिस्थितीत सापडलो की माझे ‘एथिक्स डायरेक्टर’ गांधीजींना विचारतो, काय करू? मग ते सांगतील ते करतो. व्यायाम करायला जाताना सकाळी उठायचा कंटाळा आला तर माझे ‘हेल्थ डायरेक्टर’ फरहान अख्तर मला काय म्हणतील, या विचाराने मी उठून बसतो आणि व्यायाम करायला जातो. कधीतरी काहीतरी घडतं आणि खूप निराश वाटतं. मग माझ्या ‘इन्स्पीरेशन डायरेक्टर’ हेलन केलरना पाचारण करतो. त्यांना भेटून आपल्या अडचणी फारच मामुली वाटू लागतात. कधी दुःखी झालो तर ‘इंटरटेनमेंट डायरेक्टर’ चार्ली चॅप्लीन भेटायला येतात…’
माझ्या चेहऱ्यावरील विस्मयचकित भाव पाहून तो म्हणाला..’मला माहितीय की ऐकायला हे सगळं विचित्र वाटत असेल. पण एक गोष्ट सांगतो. आयुष्य जगणं ही जर परीक्षा असेल, तर प्रत्येक माणसाने स्वतःचा ‘सीलॅबस’ बनवावा हे उत्तम ! आपण अनेकदा ‘इतरांप्रमाणे’ आयुष्य जगायचा प्रयत्न करतो आणि तिथेच फसतो. जगायचं कसं? या प्रश्नावर चिंतन करणारी लाखो पुस्तके आज बाजारात आहेत. हजारो वर्षे माणूस या प्रश्नाचं उत्तर शोधतोय. गौतम बुद्धांनी मात्र फक्त चार शब्दांत उत्तर दिलं -Be your own light. मला तर वाटतं, याहून सोपं आणि याहून कठीण स्टेटमेंट जगात दुसरं नसेल !’
मी त्या तरुणाला नाव विचारलं. त्याने सांगितलं. आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.
चार पावलं चालून गेल्यावर तो तरुण पुन्हा वळून माझ्याकडे आला. म्हणाला, ‘सगळ्यात महत्वाचं सांगायचं राहिलं. मी एका अॅक्सिडेंटमध्ये वाचलो आणि इतकं काही शिकलो. तुम्ही…प्लीज..कुठल्या अॅक्सिडेंटची वाट पाहू नका !’ आम्ही दोघेही हसलो.
अपघात फक्त वाहनांमुळेच होतात, असं थोडीच आहे? ओळखपाळख नसलेला तो तरुणही अपघातानेच भेटला की !
घरी जायला आम्ही रिक्षात बसलो. ‘प्ले झोन’मध्ये खेळून पोरगं आधीच दमलं होतं. वाऱ्याची झुळूक रिक्षात येऊ लागली. मांडीवर बसल्या बसल्या मुलगा झोपून गेला होता. त्याच्या मऊ मऊ केसांमधून हात फिरवताना संध्याकाळच्या गप्पा आठवत होत्या.
मनात आलं, ‘आपल्या पोराने जर असे ‘बोर्ड ऑफ डायरेक्टर्स’ नेमले, तर त्यात ‘त्याचा बाप’ असेल का?’
परवाच्या रात्री बराच वेळ जागा राहिलो.
कोण जाणे, कदाचित हाच प्रश्न यापुढील आयुष्य ‘चवीने’जगत राहायची उर्जा देत राहील !

Wednesday, November 19, 2014

'क' पासून Amazing Marathi

  'क' पासून Amazing Marathi:



सदर परिच्छेद हा कु. शंतनू भट यांच्या ब्लॉगवर आहे. सदर पोस्ट WhatApp वर वाचनात आली आणि आवडली म्हणून इथे शेयर केली आहे. परंतु लेखकाचे श्रेय लेखकाला मिळावे याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. म्हणून मूळ लेखकाचे नाव आणि मूळ पोस्टची लिंक लेखकानेच संपर्क केल्यामुळे आम्हाला मिळाली असून खाली देत आहोत. तसेच मूळ लेखकाला धन्यवाद.

http://shantanubhat.blogspot.in/2009/02/blog-post.html

आजकाल WhatsApp सारख्या माध्यमामुळे मूळ लेखकांचे साहित्य जगभर पसरत आहे परंतु बरेच जण ते कुणा दुस-याच्या नावाने वा स्वताच्या नावानेही प्रसिद्ध करतात. ज्याचे त्याचे श्रेय त्यांना मिळालेच पाहिजे या मताशी आम्ही सहमत आहोत. बर-याचदा असेही आढळले आहे कि कुठलातरी विनोद किंवा कविता अगदी पु.ल. किंवा सुरेश भट यांच्या नावाने पाठवली जाते. तरी वाचकांनी मूळ लेखकाचा शोध घ्यावा व असे साहित्य आढळल्यास प्रसिद्ध करणा-या वेबसाईटला कळवावे . कु. शंतनू जी पुन्हा एकदा धन्यवाद


प्रत्येक शब्द ‘क’ पासून सुरु करुन येवढा मोठा परिच्छेद

मराठी भाषेची ताकद खालील लेखात पहा. प्रत्येक शब्द ‘क’ पासून सुरु करुन येवढा मोठा परिच्छेद लिहिला आहे. जगातल्या कोणत्या इतर भाषेत अशी ताकद असेल ?
———————————————–

केव्हातरी कोल्हापूरच्या कर्तव्यतत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवने काकूंसमोर कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात्री काढून काकांच्या कामाचे कोरे करकरीत कागद कचाकचा कापले. काकांचे कापलेले कागद केशवानेच कचऱ्यात कोंबून काकांच्याच किचनमध्ये ‘कजरारे-कजरारे’ कवितेवर कोळीनृत्य केले.
काकूंनी कागद कापल्याचे कळताच काका कळवळले. काकांनीही कमालच केली. काकांनी काकूंचे काळे कुळकुळीत केस कात्रीने कराकरा कापले. काका काय करताहेत काकूंना कळेनाच! काकूंनी कर्कश्श किंचाळून कलकलाट केला. काका काकूंची कसली काळजी करणार! काकांना कामाची काळजी. काकूंच्या कर्णकर्कश्श कोलाहलातही, केशवाने कचऱ्यात कोंबलेले कागदाचे कपटेन कपटे काढून काकांनी कचेरीकडे कूच केले. कचेरीच्या कामासाठी काकांनी कंबर कसली. कागदाच्या कापलेल्या कपट्यांचे काकांनी ‘कोलाज’ करून कामकाज कार्यान्वयित केले. केशवाचे कारनामे कळताच काकांनी काट्यानेच काटा काढला. काकांनी केशवालाच कोलाजचे काम करण्यासाठी कुथवला. कपटी केशवने काकांवरच कामचुकारपणाचा कांगावा करून कामाचा कंटाळा केला. काकांनी कठोरपणे केशवाला कामावरून काढले. कासावीस काकूंनी कालच्या कडू कारल्याची कोशिंबीर कटाप करून काकांसाठी कच्च्या कैरीचे कोय काढून कालवण केले. काकांनीही करुणेने काकूंचे कृत्रिम केस कुरवाळले. केळकरांच्या कोकणस्थ कुटुंबात कर्तव्यापुढे कर्मकांड केव्हाही कनिष्ठच. कर्तव्यदक्ष काकांच्या कार्यकाळात कचेरीने कर्मरूपी किल्ल्याचे कीर्तिशिखर काबीज केले. कामावरून काढलेल्या केशवाने कितीतरी काबाडकष्ट काढल्यावर कोल्हापूरच्या कॉम्रेड कणेकर कॉलेजने केशवाला कबड्डीचा कर्णधार केला. क्रिडापटू केशवाने कबड्डीतच करियर केले. कालच्या कागाळीखोर केशवाला काळानेच केला ‘कबड्डीतल्या किचकट कसरतींचा कर्ता’!

कथासार
-
क्रियेविण करिता कथन, किंवा कोरडेची कीर्तन,
कितीक किताब कष्टाविण, काय कामाचे !!!

मूळ पोस्ट : http://shantanubhat.blogspot.in/2009/02/blog-post.html
मूळ लेखक : कु. शंतनू भट

Saturday, November 15, 2014

पैशावर  समाधान फ्री मिळण्याची मी वाट पहात आहे

पैशावर  समाधान फ्री मिळण्याची मी वाट पहात आहे.



माझं घर तसं तीन खोल्यांचेच होतं- आजोबांपासून नातवापर्यंत भरलेल होत
पोपट, कुत्रा, मांजरांनाही मुक्तद्वार होतं- घरादाराला कधीही ’लॉक'  नव्हतं..
तरीही माझ जीवन सुखाच होत ||१||
आजोबांच स्थान घरात सर्वोच्च होत- स्वयंपाकघर आजीच्या ताब्यात होत,
पाहुण्यांचे येणे-जाणे नित्याचेच होत- आई-बाबांना एकमेकांशी बोलताही येत नव्हत..
तरीही माझ जीवन सुखाच होत ||२||
घरासमोर छोटंसं अंगण होत- तुळस, प्राजक्ताला तिथे फुलता येत होत,
दारात रांगोळी काढणे अनिर्वाय होत- विहिरीवरून पाणी भरण कष्टाचं होत,
तरीही माझ जीवन सुखाच होत || ३ ||
आंघोळीला लाईफ़बॉय साबण असायचा, माणसापासून म्हशीपर्यंत सगळ्यांनाच चालायचा,
दात घासायला कडुलिंबाचा फ़ाटा लागायचा- दगडाने अंग घासण फ़ारस सुसह्य नव्हतं
तरीही माझ जीवन सुखाच होत || ४ ॥
पायात चप्पल असण सक्तीच नव्हतं- अंडरपॅट बनियनवर फ़िरण जगन्मान्य होतं
शाळेसाठी मैलभर चालण्याच अप्रूप नव्हतं- मोठ्यांना सायकलशिवाय दुसर वाहन नव्हत..
तरीही माझ जीवन सुखाच होत || ५ ॥
शाळेत गुरुजनांप्रती आदर होता- घोकंपट्टीला दुसरा पर्यायच नव्हता,
पाढे पाठांतराचा आग्रह सर्वत्र होता- छडी हे शिक्षकाचं लाडक शस्त्र होतं..
तरीही माझ जीवन सुखाच होत || ६ ॥
शाळेत गरीब श्रीमंत हा भेदभाव नव्हता, --नादारी सांगण्यात काही संकोच नव्हता,
अंगणात येवून शिकणाराही एक वर्ग होता -  कलांना "भिकेचे डोहाळे" असच नाव होते,
तरीही माझ जीवन सुखाच होत || ७ ॥
नव्या कपड्यांचा लाभ लग्न-मुंजीतच व्हायचा - पाटाखालच्या इस्त्रीला पर्याय नसायचा, 
शाळेचा युनिफोर्म थोरल्याकादूनच मिळायचा - तिन्हीसांजेला घरी परतणे सक्तीच होते,
तरीही माझ जीवन सुखाच होत || ८ || 
वळचणीत चिमण्यांच्या पिढ्या नांदायाच्या - पोपटांचा थवा झाडावर विसावायचा,
कुत्रा, मांजर, डुकरानी गाव भरलेला असायचा - उंदीर, डास, ढेकुण यांचे सार्वभौम्या राज्य होत..
तरीही माझ जीवन सुखाच होत || ९ ||
पुस्तकातले प्राणी अचानक रानात दिसायचे - घाबरगुंडी उडाली तरी ते आपलेच वाटायचे,
उरलेले प्राणी नंतर पेशवेपार्कात भेटायचे - नौनवेज खाण हे तर माहितीच नव्हत,
तरीही माझ जीवन सुखाच होत || १० ||
शाळेत अभ्यासाला खूप महत्व होते- नंबरावर बक्षीस/छड्या यांचे प्रमाण ठरत असत, 
कॉपी, गाईड, क्लासेसना स्थानही नव्हत - वशिल्याने पास होण माहितीच नव्हत,
तरीही माझ जीवन सुखाच होत || ११ ||
गावची जत्रा  हीच एक करमणूक असायची - चक्र - पाळण्यात फिरण्यात मजा मिळायची, 
बुढ्ढीके बाल, गाठीशेवेची तोंडलावणी व्हायची - विमानातला फोटो काढण चमत्कारिक होत,
तरीही माझ जीवन सुखाच होत || १२ ||
गावाबाहेरच जग हिरवागार असायचं - सगळ्या नद्यांचे पाणी स्वच्छच असायचे, 
पावसाळ्यात ढगांनी आकाश भरायचं - प्रदूषण, पर्यावरण वगैरे माहितीच नव्हत,
तरीही माझ जीवन सुखाच होत || १३ ||
  
हुतुतू आट्यापाट्याचा खेळ गल्लीत चालायचा - क्रिकेटच्या मैचेस चाळीत व्हायच्या,
बापू नाडकर्णी, चंदू बोर्डेच्या गोष्टी रंगायच्या -  डे-नाईट, ट्वेंटी- २० चे नावही नव्हते,
तरीही माझ जीवन सुखाच होत || १४ ||
प्रवास झालाच तर एस्तीनेच व्हायचा - गचके, ठेचकाळणे याला अंत नसायचा,
होल्डोलसोबत फिरकीचा तांब्याही लागायचा - लक्झरी, फर्स्टक्लास एसीच नावही नव्हत,
तरीही माझ जीवन सुखाच होत || १५ ||
दिवाळी खर्या अर्थाने दिवाळी होती - चमन चिडी, पानपट्टी, भुईनळ्या यांची रात होती,
रंगीत तेल, उटणे, मोती साबणाची ऐश होती - लाडू, चकल्या, करंज्या यांचे दर्शन वार्षिकच होत..
तरीही माझ जीवन सुखाच होत || १६ ||
जुनाट रेडिओतून आकाशवाणी बरसायाची - बिनाका गीतामालेने बुधवारची रात्र सजायची,
रेडीवो सिलोनने तारुण्याची लज्जत वाढायची - ताई, नाना हरबा यांच्या इतकाच बालोद्यान असायचा,
तरीही माझ जीवन सुखाच होत || १७ ||
खाण्याच्या बाबतीत भेदभाव केला जायचा - दादाच्या ताटात जास्त शिरा पडायचा,
पानात टाकणार्याच्या पाठीत रट्टा बसायचा - हौटेलात जाणं तर पूर्ण निषिद्ध होत,
तरीही माझ जीवन सुखाच होत || १८ ||
मामाच्या गावाला कधी जाणं-येण होत - धिंगामस्ती करायला नैशनल परमिट होत,
विहिरीत पोहायला तिथेच मिळत होत - भावूबिजेला आईच्या ताटात फारस पडत नव्हत,
तरीही माझ जीवन सुखाच होत || १९ ||
घरातले पुरुष कर्तेसवरते असायचे - बायांना दुपारी झोपणे माहिती नसायचे,
पोराबाळाना गोडधोड सणावारीच मिळायचे - प्रायव्हसीला तिथे काडीचंही स्थान नव्हत,
तरीही माझ जीवन सुखाच होत || २० ||
पाव्हणे रावळे इ चा घरात राबता असायचा - सख्खा, चुलत, मावस असा भेदभाव नसायचा,
गाववाल्यानाही पंक्तीत सन्मान असायचा - पंक्तीत श्लोक म्हणण मात्र सक्तीच होत,
तरीही माझ जीवन सुखाच होत || २१ ||  
आज घराऐवजी लक्झुरीयास फ्लेट आहे - मोपेड, स्कूटर, मोटारचा सूळसुळाट आहे, 
टीव्हीवर शंभर वाहिन्यांचा दनदणात आहे - फास्टफूड, पार्ट्या, ड्रिंक्स याना सन्मान आहे,
कौटुंबिक सुसंवादाची मात्र वानवा आहे || २२ ||
आज मुलांसाठी महागडी शाळा-कॉलेजेस आहेत - दूध, बूस्ट, कोम्प्लैनचा भरपूर मारा आहे,
क्लास, गाईड, कैल्क्यूलेटरची ऐशच ऐश आहे - कपडे, युनिफोर्म. क्रीडासाहित्य हवे तितके आहे,
बालकांच्या नशिबी मात्र  पाळणाघर आहे || २३ ||
आज पतीला ऑफिसात मरेस्तोवर काम आहे - सुशिक्षित पत्नीला करियरचा हव्यास आहे,
एक्स्ट्रा ऐक्तिवितीजना घरात सन्मान आहे - छंद, संस्कार यांच्यासाठी क्लासेस उपलब्ध आहे,
आजीआजोबाना वृद्ध आश्रमाचा रस्ता मोकळा आहे || २४ ||
आज घरात प्रचंड आर्थिक सुबत्ता आहे - मागेल ती वस्तू क्षणात हजार होते आहे,
इन्स्टालमेंट, क्रेडीट कार्डचा सूळसुळाट आहे - सध्या बायवान गेटवनचा जमाना आहे..
म्हणून
पैशावर  समाधान फ्री मिळण्याची मी वाट पहात आहे, 
पैशावर  समाधान फ्री मिळण्याची मी वाट पहात आहे.. || २५ ||

Source: https://www.facebook.com/TejashreePradhanOfficialPage/posts/304351639767545


Sunday, November 9, 2014

दमलेल्या बाबाची नाही सुटलेल्या ढेरीची कहाणी

सुटलेल्या ढेरीची कहाणी


दमलेल्या बाबाची जर एक कहाणी असू शकते तर
सुटलेल्या ढेरीचीही असू शकते !!
so here it goes...
तळलेली खरपूस एक भजी राणी! चटणीच्या संगे
आणी तोंडामध्ये पाणी !!
रोजचेच आहे सारे, आज नवे काही नाही, माफी कशी मागू
आज तोंड बंद नाही!!
एकाच घासात भजी खातो मी खुषीत,
त्यावरी कटींगही मारीन बशीत!!
सांगायाचे आहे माझ्या बटाट्या वड्या!
सुटलेल्या पोटाचीही कहाणी तुला!!
ला लाला ला ला ला लाला ला ला!!
आटपाट नगरात खादाड मी भारी! सकाळच्या चहामध्ये
पाव आणि खारी!!
रोज सकाळीच मी स्वत:शी बोले! मिसळ हाणायाचे आज
राहूनच गेले!!
जमलेच नाही जाणे काल मला जरी! आज तरी ठुसणार
भाजी आणि पुरी!!
भैय्याच्याही गाडीवर मारून मी फेरी!
नासलेल्या पाण्यातली खाई पाणीपुरी!!
मळक्या हातांचा भैय्या आवडे मला!
सुटलेल्या पोटाचीही कहाणी तुला!!
ला लाला ला ला ला लाला ला ला!!
आँफिसात दिसभर असतो बसून! फिरणारी खूर्ची झेली देहाचे
वजन!
तास तास जातो लंच ब्रेकची वाट बघून, एक एक पाकीट संपे
वेफर्स गट्टम!
अशा वेळी काय सांगू काय काय वाटे, आतडी पिळवटी,
वात आत दाटे !!
वाटते की उठुनिया दोन पावले फिरावे, किती भरू
पोटामध्ये आता नको व्हावे
उगाचच चालावे नी भांडावे स्वतःशी, भरलेला मैदा येऊ पाहे
गळ्य़ाशी
उधळत, खिदळत, धावणार कधी? वजनाचे वाजले बारा,
कमी होणार कधी??
हासुनिया उगाचच ओरडेल आता, गर्रकन
फिरणारा वजनाचा काटा
तरी सुद्धा दोघे जण दंगा मांडू असा, क्षणा क्षणावर ठेवू
खादाडीचा ठसा।
सांगायाचे आहे माझ्या बटाट्या वड्या!
वाढलेल्या वजनाची कहाणी तुला!!
ला लाला ला ला ला लाला ला ला!!
(C) सारंग लेले,


हि कविता WhatApp वर आलेली आहे व त्यात सारंग लेले हे कवीचे नाव आहे. जर याचा मूळ लेखक कोणी दुसरा असेल तर कृपया संपर्क साधावा