Wednesday, July 8, 2015

गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो

गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो
तिच्या एका “झलके” साठी बोळ बोळ फिरायचो,
ती दिसायची नाही पण तिचा बाप बाहेर यायचा,
त्याला कळू नये म्हणून मग “झाल का जेवण” विचारायचो
गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो

शेवटच्या बाकड्यावर बसून तीला बघत असायचो,
ती कधी तरी पहायची मग विचारात गुंतत रहायचो,
हिला आता विचारूच म्हणत तिच्या मागे फिरायचो,
चिंचा, आवळे, बोरं तिला कुरणात जावून आणायचो
गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो

यात्रे दिवशी तेवढ देवाला निवद घेवून जायचो,
नदीवरच्या पुलावर तिची वाट पहात असायचो,
ती यावी म्हणू आधीच देवाला नवस बोललेलो असायचो,
ती आल्यावर मात्र नारळ फोडून देवाचा नवस मग फेडायचो
गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो

धुणं धूया ती जेव्हा नदीकाठी यायची,
कमरेवर बादली आणि मैत्रीण सोबत असायची,
आम्ही मात्र चड्डीवर पाण्यात उड्या मारायचो,
मग खेकड्यावानी कपारीला लपून तिला पाहायचो
गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो

तिच्या मैत्रिणीच्या लग्नात आवर्जून जायचो,
नवरा भावबंद असल्यासारख घोड्यासमोर नाचायचो,
तिनं बघाव म्हणून जोरात उड्या मारायचो,
ती हसलेली बघून आनंदात न जेवताच घरी यायचो
गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो

मग कधी तिला मुलगा पाहायला यायचा,
आम्ही तेव्हा मात्र पांदीला गुरामाग असायचो,
बघून देखून गेल्यावर आम्हाला बातमी ती कळायची,
मग आपल रात्री नुकताच विचार करत झोपायचो,
गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो

शेवटी तिच्या लग्नाची पत्रिका घरी यायची,
आम्ही ती तेव्हा मात्र निरखून वाचायचो,
कार्यवाहकाच्या यादीत तेव्हा आम्ही असायचो,
तीच लग्न तेव्हा जबाबदारीन पार पाडायचो,
गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो

तिच्या लग्नात लाडू खाल्यावर आम्ही घरी परत यायचो,
रानामधी जावून सरीच्या अंकुराशी बोलायचो,
दोन तीन दिवस न जेवताच गावात फिरत रहायचो,
मनामधी तेव्हा खरच फार रडायचो,
गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो

ती सोळाव्याला आली की तिला जावून भेटायचो,
कस आहे सासर सारी विचारपूस करायचो,
नकळत तेव्हा तिच्या डोळ्यात येणारे हळुवार पाणी पाहायचो,
आणि मग तेव्हा तिच्या मनातल प्रेम आम्ही समजायचो,
गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो


कवी : Mr. Sagar Kakade. ९९६०४५५५२२
कविता WhatsApp वर वाचनात आली. आवडली म्हणून शेअर केली. कवीचे नाव कळल्यास श्रेय देण्यात येईल.

Sunday, June 28, 2015

सुखांमागे धावता धावता

झकास कविता
सुखांमागे धावता धावता
विवेक पडतो गहाण
पाण्यात राहूनही माशाची मग
भागत नाही तहान
स्वप्न सत्यात आणता आणता
दमछाक होते खूप
वाटी-वाटीने ओतलं
तरी कमीच पडत तूप
बायको आणि पोरांसाठी
चाले म्हणे हा खेळ
पैसा आणून ओतेन म्हणतो
पण मागू नका वेळ
करिअर होतं जीवन मात्र
जगायचं जमेना तंत्र
बापाची ओळख मुलं सांगती
पैसा छापणारं यंत्र
चुकून सुट्टी घेतलीच तरी
पाहुणा 'स्वतःच्या घरी'
दोन दिवस कौतुक होतं
नंतर डोकेदुखी सारी
मुलच मग विचारू लागतात
बाबा अजून का हो घरी?
त्यांचाही दोष नसतो
त्यांना याची सवयच नसते मुळी
सोनेरी वेली वाढत जातात
घरा भोवती चढलेल्या ,
आतून मात्र मातीच्या भिंती
कधीही न सारवलेल्या
आयुष्याच्या संध्याकाळी मग
एकदम जाणवू लागतं काही,
धावण्याच्या हट्टापायी आपण श्वासच मुळी घेतला नाही
सगळं काही पाहता पाहता
आरशात पाहणं राहून गेलं
सुखाची तहान भागवता भागवता
समाधान दूर वाहून गेल

Monday, June 8, 2015

पुणे का आवडते..? Why we love Pune

पुणे का आवडते.. ?

सोन्याच्या फाळाने नांगरलेले शिवबाचे पुणे,
पेशव्यांच्या 'सर्व' पराक्रमांचे पुणे..
लाल महालात 'तोडलेल्या' बोटांचे पुणे..
इथून तिथवर असलेल्या पुलांचे पुणे..
'कोटी'सूर्य असलेल्या पु.लं. चे पण पुणे..
नावात इंग्लिश असून सुद्धा मराठीतच शिकवणा-या रमण बागेतले आणि टिळक रोड वरचे पुणे..
"सौ. विमलाबाई गरवारे च्या पोरांचा गर्वच नाही तर माज आहे पुणे"
सव्वाशे दीडशे वर्षांपासून अखंड पुणेकर घडवणा-या नू.म.वि., भावे स्कूल चे पुणे..
SP, FC, BVP, SIMBY, Modern, MIT आणि वाडिया चे पुणे..
आणि त्यातल्या तोंडाला रुमाल लावून (की बांधून?) Two Wheeler वाल्या मुलींचे पुणे..
RTO कडून License to kill इश्यू करून घेतलेल्या जगातल्या सर्वात सुंदर मुलींचे पुणे..
Info Tech park चे पुणे..
Koregaon Park चे पुणे..
कॅम्पातल्या श्रूजबेरी वाल्या कयानींचे पुणे..
चितळ्यांच्या बाकरवडी चे पुणे..
वैशाली च्या yummy सांबार चे पुणे..
रुपालीच्या भन्नाट कॉफी चे पुणे..
तुळशीबागेतल्या स्वस्ताई चे पुणे आणि पगडी आणि पुणेरी जोड्यांचे पुणे..
खास बेडेकर, श्री आणि कधी कधी रामनाथ च्या मिसळीचे पुणे..
JM Road च्या Mac आणि KFC चे पुणे..
कॅड बी आणि कॅड एम चे पुणे..
सोडा शॉप चे पण पुणे..
अभिनव चे एकदम हटके कलाकारी पुणे..
University मध्ये शिकणा-यांचे पुणे, आणि University च्या जंगलात 'दिवे लावणा-यांचे पुणे..
कधी ही न थकणा-या लक्ष्मी रोड, MG रोड आणि Hongkong गल्ली चे पुणे (तिथली साधी डोक्याची पिन सुद्धा HONGKONG वरून येत नाही)..
खवय्यांसाठी जीव देणा-या German Bakery चे पुणे, आणि चवी साठी जीव टाकणा-या खवय्यांचे पुणे..
बादशाही,जनसेवा आणि आशा च्या Veg 'थाळी' वाले पुणे..
सदशिवातले बिनधास्त Nonveg वाले पुणे, आणि रमझान मधल्या त्या मोमीनपु-यातले रात्रीचे लजीज पुणे..
मस्त पैकी दहा बारा दिवस कल्ला करणा-या आमच्या गणपती बाप्पांचे पुणे..
शिकणा-यांचे पुणे आणि चांगलेच शिकवणा-यांचे पण पुणे..
'सरळ' मार्गी प्रेमिकांच्या 'Z' bridge चे पुणे..
सगळी कडे खोचक पाट्या लावून शहाण्याला शब्दांचा मार देणारे पुणे..
ताजमहाल पाहून सुद्धा "बरा बांधलाय पण मेलेल्या बायको साठी एवढा खर्च केलान" अशी तोंडभर स्तुती करणारे पुणे..
फटकळ, खवचट, उद्धट यांना विशेषण समजून छाती फुगवणारे पुणे..
'इथे उचलून धरलं तर जगात कोणाची पडण्याची टाप नाही' अशी ख्याती मिरवणारे पुणे !..
पेशवे पार्कातल्या पांढ-या मोरांचे आणि वाघांचे पुणे..
आठवणींच्या बोगद्यातून अजूनही शिटी वाजवत जाणा-या "फुलराणी" चे पुणे..
भरत, टिळक आणि बालगंधर्व चे पुणे..
पुरुषोत्तम आणि फिरोदियाच्या जल्लोषाचे पुणे..
bollywood ला acting ची अक्कल शिकवणा-या wisdom tree चे पुणे, आणि जगभरातल्या फिल्म्स जपून ठेवणा-या 'NFAI' चे पुणे..
फक्त आठवणीत राहिलेल्या मिनर्व्हा, भानुविलास आणि नटराज चे पुणे..
आशियातल्या पहिल्या multiplex चे पुणे..
गोगलगायीशी स्पर्धा करणा-या PMPML चे पुणे..
प्रचंड बडबड करून समोरच्याला दमवणा-यांचे पुणे आणि
कमीत कमी शब्दात प्रचंड अपमान करण्याचे सामर्थ्य बाळगणारे पुणे..
लग्नाची शान पुण्यातच असे म्हणणारे मंगल कार्यालयांचे पुणे..
प्रत्येक पेठेतल्या खास पुणेरी मारुतींचे पुणे..
Christmas ला MG Road ला हौसेने केक खाणारे पुणे..
भर उन्हात दुपारी सुद्धा अमृततुल्य मधला चहा पिणारे पुणे..
सुसाट गल्ली आणि बोळांचे पुणे..
Express highway ने निवांत मुंबईला जाणारे पुणे...
पहिला संपूर्ण भारतीय सुपर कॉम्प्युटर बनवणारे पुणे..
आणि "आम्हाला कशाला लागतोय mobile ?" असे पण म्हणणारे पुणे..
जगभरातल्या रस्त्यांवर धावण्यासाठी Mercs, VolksWagon आणि Jaguar, Nano बनवणारे पुणे..
सकाळ संध्याकाळी फिरायला जाणा-या थकलेल्या पायांचे पुणे,
Weekend ला सह्याद्री आणि वर्षातून एकदा तरी हिमालय तुडवणा-यांचे पुणे..
पर्वती वर प्रॅक्टीस करून Everest ला गवसणी घालणारे पण पुणे..
पावसातल्या सिंहगडावरच्या चहा आणि खेकडा भज्यांचे पुणे..
उन्हाळ्यातल्या रसवंती गृहातल्या जम्बो ग्लास चे पुणे,..
Sunday ला सकाळी पॅटीस, पोहे आणि दुपारची निवांत झोप काढणा-यांचे पुणे,
कसबा आणि गुरूवारातल्या भावड्यांचे पुणे..
सदाशिव, नारायण, शनिवारातल्या भाऊंचे पुणे..
बारा महिने २४ तास online असणारे, पण दुकान मात्र दुपारी दोन-चार तास बंद ठेवणारे,
असे आमची कुठेही शाखा नसलेले एकमेवाद्वितीय पुणे !!

Wednesday, May 27, 2015

वाचावीत अशी १०० मराठी पुस्तके - must read 100 marathi books

वाचावीत अशी १०० पुस्तके

मराठी साहित्य हे असंख्य साहित्यिकांच्या लेखणीतून समृद्ध झालेले आहे. कथा ,कादंब-या,कविता,कथासंग्रह,ललित लेख आणि असेच बरेच साहित्य उपलब्ध आहे. या साहित्य सागरातून काही 
वाचावीत अशी १०० पुस्तके खाली दिली आहेत. नव्या पिढीला वाचनाचा छंद जडावा व त्यांना या काय वाचावे हा प्रश्न पडलाच तर हि पोस्ट कामी येईल.



०१.) ययाती = वि. स. खांडेकर
०२.) वळीव = शंकर पाटील
०३.) एक होता कार्वर = वीणा गवाणकर
०४.) शिक्षण = जे. कृष्णमूर्ती
०५.) अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम = शंकरराव खरात
०६.) यक्षप्रश्न = शिवाजीराव भोसले
०७.) बनगरवाडी = व्यंकटेश माडगुळकर
०८.) तीन मुले = साने गुरुजी
०९.) तो मी नव्हेच = प्र. के. अत्रे.
१०.) आय डेअर = किरण बेदी
११.) व्यक्तिमत्त्व संजीवनी = डॉ. वाय. के.शिंदे
१२.) मृत्युंजय = शिवाजी सावंत
१३.) फकिरा = अण्णाभाऊ साठे
१४.) राजा शिवछत्रपती = बाबासाहेब पुरंदरे
१५.) बुद्धीमापन कसोटी = वा. ना. दांडेकर
१६.) पूर्व आणि पश्चिम = स्वामी विवेकानंद
१७.) वेदांताचे स्वरूप आणि प्रभाव = स्वामी विवेकानंद
१८.) निरामय कामजीवन = डॉ. विठ्ठल प्रभू
१९.) आरोग्य योग = डॉ. बी.के.एस. अय्यंगार
२०.) अंधश्रधा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम = डॉ. नरेंद्र दाभोळकर
२१.) लोकमान्य टिळक = ग. प्र. प्रधान
२२.) राजयोग = स्वामी विवेकानंद
२३.) तरुणांना आवाहन = स्वामी विवेकानंद
२४.) सत्याचे प्रयोग = मो. क. गांधी
२५.) योगासने = व. ग. देवकुळे
२६.) १८५७ ची संग्राम गाथा = वि.स.वाळिंबे
२७.) कर्मयोग = स्वामी विवेकानंद
२८.) गाथा आरोग्याची = डॉ. विवेक शास्त्री
२९.) रणांगण = विश्राम बेडेकर
३०.) बटाट्याची चाळ = पु.ल.देशपांडे
३१.) श्यामची आई = साने गुरुजी
३२.) माझे विद्यापीठ ( कविता ) = नारायण सुर्वे
३३.) १०१ सायन्स गेम्स = आयवर युशिएल
३४.) व्यक्ति आणि वल्ली = पु.ल.देशपांडे
३५.) माणदेशी माणसं = व्यंकटेश माडगुळकर
३६.) उचल्या = लक्ष्मण गायकवाड
३७.) अमृतवेल = वि.स.खांडेकर
३८.) नटसम्राट = वि.वा.शिरवाडकर
३९.) हिरवा चाफा = वि.स.खांडेकर
४०.) क्रोंचवध = वि.स.खांडेकर
४१.) झोंबी = आनंद यादव
४२.) इल्लम = शंकर पाटील
४३.) ऊन = शंकर पाटील
४४.) झाडाझडती = विश्वास पाटील
४५.) नाझी भस्मासुराचा उदयास्त = वि.ग. कानिटकर
४६.) बाबा आमटे = ग.भ.बापट
४७.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर = शंकरराव खरात
४८.) एक माणूस एक दिवस भाग १ = ह.मो.मराठे
४९.) एक माणूस एक दिवस भाग २ = ह.मो.मराठे
५०.) एक माणूस एक दिवस भाग ३ = ह.मो.मराठे
५१.) आई = मोकझिम गार्की
५२.) स्वभाव , विभाव = आनंद नाडकर्णी
५३.) बलुत = दया पवार
५४.) कर्ण , खरा कोण होता = दाजी पणशीकर
५५.) स्वामी = रणजीत देसाई
५६.) वपुर्झा ( भाग १-२ ) = व. पु. काळे
५७.) पांगिरा = विश्वास पाटील
५८.) पानिपत = विश्वास पाटील
५९.) युंगंधर = शिवाजी सावंत
६०.) छावा = शिवाजी सावंत
६१.) श्रीमान योगी = रणजीत देसाई
६२.) जागर खंड – १ = प्रा. शिवाजीराव भोसले
६३.) जागर खंड – २ = प्रा. शिवाजीराव भोसले
६४.) चंगीजखान = उषा परांडे
६५.) आर्य चाणक्य = जनार्धन ओक
६६.) भारताचा शोध = पंडित जवाहरलाल नेहरू
६७.) गोष्टी माणसांच्या = सुधा मूर्ती
६८.) वाईज अंड आदर वाईज
६९.) उपेक्षितांचे अंतरंग = श्रीपाद महादेव माटे
७०.) माणुसकीचा गहिवर = श्रीपाद महादेव माटे
७१.) यश तुमच्या हातात = शिव खेरा
७२.) आमचा बाप अन आम्ही = डॉ. नरेंद्र जाधव
७३.) कोसला = भालचंद्र नेमाडे
७४.) बखर : एका राजाची = त्र्यं. वि. सरदेशमुख
७५.) मनोविकारांचा मागोवा = डॉ. श्रीकांत जोशी
७६.) नापास मुलांची गोष्ट = संपा. अरुण शेवते
७७.) एका कोळियाने = अन्रेस्ट हेमींग्वे
७८.) महानायक = विश्वास पाटील
७९.) आहे आणि नाही = वि. वा. शिरवाडकर
८०. ) चकवा चांदण – एक विनोपनिषद = मारुती चितमपल्ली
८१.) शालेय परिपाठ = धनपाल फटिंग
८२.) मराठी विश्वकोश भाग – १,२,३,१४,१५,१६ = तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
८३.) ग्रामगीता = राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
८४.) अभ्यासाची सोपी तंत्रे = श्याम मराठे
८५.) यशाची गुरुकिल्ली = श्याम मराठे
८६.) हुमान = संगीता उत्तम धायगुडे
८७़.) झटपट गुणाकाराची भारतीय तंत्रे = श्याम मराठे
८८.) द्रुतगणित वेद = श्याम मराठे
८९.) तोत्तोचान = तेत्सुको कुरोयानागी
९०.) शिक्षक असावा तर …? = गिजुभाई
९१.) एका माळेचे मणी ( गणित ) = नागेश शंकर मोने
९२.) दिनदर्शिके मधील जादू = नागेश शंकर मोने
९३.) ऋणसंख्या = नागेश शंकर माने
९४.) गणित छःन्द भाग -२ = वा. के. वाड
९५.) गणित गुणगान = नागेश शंकर मोने
९६.) मण्यांची जादू = लक्ष्मण शंकर गोगावले
९७.) मनोरंजक शुन्य = श्याम मराठे
९८.) उत्तरातून प्रश्ननिर्मिती = नागेश शंकर मोने
९९.) क्षेत्रफळ आणि घनफळ = डॉ. रवींद्र बापट
१००.) संख्यांचे गहिरे रंग = प्रा. मोहन आपटे

मराठी पुस्तके online खरेदी करण्यासाठी काही वेबसाईट खाली देत आहोत.

ता.क. : हि १०० पुस्तके म्हणजे मराठी साहित्यातील "TOP BEST 100" असे आमचे अजिबात म्हणणे नाही तेव्हा यात नसलेले व ते असावे असे तुम्हाला वाटत असेल तर पुस्तकाचे नाव कमेंट मध्ये टाकून हि यादी वाढवावी.



Tuesday, May 12, 2015

मराठी विलोमपदे Marathi Palindromes - भाऊ तळ्यात ऊभा

मराठी विलोमपदे 

Marathi Palindromes

मराठी विलोमपद म्हणजे असे वाक्य जे उलटे वाचले तरी अगति सरळ वाचल्यासाराखेच असते.
लहानपणी Palindrome हा प्रकार आवडायचा.
Palindrome म्हणजे असा शब्द, वाक्प्रचार , वाक्य किंवा कोणतीही अर्थपूर्ण अक्षररचना जी शेवटाकडून सुरूवातीकडे वाचत गेलं तरी बदलत नाही.
इंग्रजीत Palindrome ची रेलचेल आहे. पण मराठीत हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच.  लहानपणी तर दोन तीनच माहित होते.
१)  चिमा काय कामाची
२) ती होडी जाडी होती.
३) रामाला भाला मारा.
पण अलिकडे कळलं की मराठीत Palindrome ला 'विलोमपद' असा शब्द आहे, आणि मराठीतली विलोमपदे देणारं चक्कं एक Android app (Marathi Palindromes नावाचं) सुद्धा आहे.
ही म्हणजे हाईट झाली, मराठीची इंग्रजीशी लय भारी फाईट झाली.
मराठी धावत नसली तरी एक एक 'पाऊल पडते पुढे' हे, तुम्ही काही म्हणा, पण अगदी Like करण्यासारखं आहेच.
आता ही मराठी विलोमपदे बघा (नया है यह हं !)
१) टेप आणा आपटे.
२) तो कवी ईशाला शाई विकतो.
३) भाऊ तळ्यात ऊभा.
४) शिवाजी लढेल जीवाशी.
५) सर जाताना प्या ना ताजा रस.
६) हाच तो चहा
वा वा, हे ताजे मराठी पॅलिनड्रोम्स, आय मीन, विलोमपदे वाचून मझा आला. आणखी काही विलोमपदे, आय मीन, पॅलिनड्रोम्स माहित आहेत का कोणाला? की मराठी पाऊल थांबते इथे?

१. चिमा काय कामाची
२. भाऊ तळ्यात ऊभा
३. रामाला भाला मारा
४. काका, वाचवा, काका
५. काका, वाहवा ! काका
६. ती होडी जाडी होती
७. तो कवी डालडा विकतो
८. तो कवी मोमो विकतो
९. तो कवी सामोसा विकतो
१०. तो कवी कोको विकतो
११. तो कवी ईशाला शाई विकतो
१२. तो कवी रीमाला मारी विकतो
१३. तो कवी वामाला मावा विकतो
१४. तो कवी व्हिटी ला टिव्ही विकतो
१५. तो कवी विकीला किवी विकतो
१६. तो कवी चहाच विकतो
१७. तो कवी का विकतो?
१८. तो कवी लिली विकतो
१९. तो कवी ऊमाला माऊ विकतो
२०. तो कवी ठमाला माठ विकतो
२१. तो कवी कणिक विकतो
२२. तो कवी बेड व डबे विकतो
२३. तो कवी ठमीला मीठ विकतो
२४. मराठी राम
२५. तो कवी चक्काच विकतो
२६. तो कवी हाच चहा विकतो
२७. तो कवी राशीला शिरा विकतो
२८. तो कवी टोमॅटो विकतो

आणखी काही असेच विलोमपद तुम्हाला माहित असल्यास कमेंट मध्ये टाकायला विसरू नका.
हि पोस्ट सुधा WhatsApp वर वाचनात आली म्हणून इथे शेअर करत आहे. लेखकाचे आभार. नाव कळवल्यास या पोस्टचे श्रेय नक्की देऊ.

पोस्ट वाचल्यानंतर मी Android App चा शोध घेतला आणि ते माझ्या मोबाईल वर स्थापित केले (मराठीत इंस्टाल केले).खाली दिलेल्या लिंकवर ते मोफतउपलब्ध आहे.