Friday, October 11, 2013

'गाय' या विषयावर निबंध

सरांनी वर्गात मुलांना सांगितलं
'' उद्या येताना 'गाय' या विषयावर निबंध लिहून आणा...''
मग वाचा आपल्या 'गणप्या' ने लिहलेला निबंध

"अमेरिकेमध्ये मुलाला 'गाय' असे म्हणतात.
भारतात गवत खाणा-या प्राण्याला गाय असे म्हणतात. गाईला चार पाय आणि दोन कान असतात. गाईचे तोंड गायतोंडे सरांसारखे असते.

गायी फावल्या वेळेत शेपटीने माश्या मरतात.
मेलेल्या माशांचे सुकड बोंबील करतात. ते टेस्टी असते.
गायी गोठ्यामध्ये गाई-गाई करतात. गाय दूध देते पण आम्ही चितळ्यांचे दूध पितो.

गाईच्या 'शी'ला शेण असे म्हणतात. शीला ताई शेणाच्या गौ-या करते. गाईच्या पिल्लाला वासरू असे म्हणतात. वसु बारसेला वासराचे बारसे करतात. गाईची पूजा होते.

पूजा मला आवडते. ती माझ्या शेजारी बसते. गाईला माता म्हणतात.

भारत माता की जय!!!!

Friday, October 4, 2013

एकदा वाचा… थोडा वेळ लागेल पण नक्कीच आवडेल...एखादा छान ड्रेस आवडतो आपल्याला, दुकानात असलेल्या कपड्यांच्या गर्दीत तो साधा वाटतो, पण तरीही आवडतो पण काहीतरी दुसरे घेऊन बाहेर पडतो आपण....
परतताना मनात विचार येतो ‘तो ड्रेस घ्यायला हवा होता''.सिग्नलला गाडी थांबते,
चिमुरडी काच ठोठावते. गोड हसते, पण भिक मागत आहे हे लक्षात घेऊन त्या हसण्याकडे फार लक्ष देत नाही आपण... २-३ रुपये द्यावे असे मनात येते...


रेंगाळत सुटे शोधता शोधता ‘देऊ का नको’ हा धावा मनात सुरू असतो, तेवढ्यात सिग्नल सुटतो, गाडी पुढे घ्यायची वेळ येते...
थोडे पुढे गेल्यावर मन म्हणते, ‘सुटे होते समोर, द्यायला हवे होते त्या चिमुरडीला'.


जेवणाच्या सुट्टीत ऑफिसातला मित्र त्याच्या घरातला त्रास फार विश्वासाने सांगतो, त्याच्या डोळ्यात व्यथांचे ढग दाटलेले दिसतात...
वाईट वाटते खूप, नशीब आपण त्या परिस्थितीत नाही असेही मनोमनी पुटपुटून आपण मोकळे होतो...
‘काही मदत हवी का?’ असे विचारायचे असूनही आपण गप्प राहतो." जेवणाची सुट्टी संपते...तो त्याच्या आणि आपण आपल्या कामाला लागतो...
क्षणभर स्वत:वर राग येतो, ‘मदत तर विचारली नाही, निदान खांद्यावर सहानुभूतीचा हात तरी ठेवायला हवा होता मी!


असेच होते नेहमी, छोट्या छोट्या गोष्टी राहून जातात,  खरं तर या छोट्या गोष्टीच जगण्याचे कारण असतात.
गेलेले क्षण परत येत नाहीत,

राहतो तो ‘खेद’, ….करता येण्यासारख्या गोष्टी न केल्याचा. जगण्याची साधने जमवताना जगणेच राहून जात नाहीयेना ते ‘चेक’ कर...


==================

"आनंद झाला तर हसा.. J, “


“वाईट वाटले तर डोळ्यांना बांध घालू नका".

“चांगल्या गोष्टीची दाद द्या, “


“आवडले नाही तर सांगा,घुसमटू नका.”

“त्या त्या क्षणी जे योग्य वाटते ते करा, नंतर त्यावर विचार करून काहीच साध्य नाही. “


“आयुष्यातल्या छोट्या गोष्टींना महत्त्व द्या,”

“त्या छोट्या क्षणांना जीवनाच्या धाग्यात गुंफणे म्हणजेच जगणे.”

“आवडलेल्या गाण्यावर मान नाही डुलली तर ‘लाईफ’ कसले?”

“आपल्यांच्या दु:खात डोळे नाही भरले तर लाईफ कसले?”

“मित्रांच्या फालतू विनोदांवर पोट दुखेस्तोवर हसलो नाही तर कसले लाईफ?”


“आनंदात आनंद आणि दु:खात दु:ख नाही जाणवले तर लाईफ कसले?... छोट्या क्षणांना जीवनाच्या धाग्यात गुंफणे म्हणजेच जगणे.”

Wednesday, July 31, 2013

तुम्हाला विनोदबुद्धी कुठून मिळाली (पु.ल.देशपांडे नसती उठाठेव)

P.L. Deshpande


तुम्हाला विनोदबुद्धी कुठून मिळाली ?
ह्या प्रश्नाचे उत्तर मला सुचवणाऱ्‍याला मी इष्टेट लिहून देईल. मला वाड-वडिलार्जित फक्त आजपर्यंत संधिवात मिळाला आहे. आजीला दमा होता, त्या वाटणीची मी अत्यंत आतुरतेने वाट पाहात आहे. विनोदबुद्धी कोण देणार? ज्याने मला डोळे दिले (चष्मा वगळून- तो मी विकत घेतला.) त्याखेरीज ते दातृत्व मी आणखी कुणाच्या वाट्यावर जमा करू? गणितातला कच्चेपणा, मी माझ्या एका मामाकडून मिळवला. चित्रककलेतील अधोगतीला एक दूरचा चुलता जिम्मेदार आहे. सिग्रेटी फुंकायचे व्यसन माझ्या एका आतेभावाने लावले. इतिहासाचा तिटकारा इतिहासाच्याच गुरूजींनी निर्माण केला! त्यामुळे शिवाजीचा गुढगी रोग मी औरंगजेबापर्यंत नेऊन पोचवला आहे, आणि इंग्लंडच्या गादीवरच्या चार्लसबरोबर अनेक हेन्री मंडळींची मुंडकी तिमाही - सहामाहीत ह्या हाताने उडवली आहेत. संगीताची आवड ही शेजारच्या घरात वेळीअवेळी पेटी बडवणार्या एका इसमावर सूड म्हणून उत्पन्न करून घेऊन त्याची पेटी बंद पाडली. नाटकात पहिली भूमीका मिळाली, ती 'नरवीर तानाजी मालुसरे' ह्या नाटकाच्या सोनावणे मास्तरांनी 'डायरेक्शण' केलेल्या प्रयोगात! तानाजी मेल्यावर जे मावळे पळतात, त्यांतला आघाडीवरचा मावळा म्हणून मराठी रंगभूमीला माझा चिमुकला पदस्पर्श झाला. "मूर्खांनो! तो दोर मी केव्हाच कापला आहे," हे सूर्याजीचे भाषण ज्या मूर्खांना उद्देशून होते त्यातला मी आघाडीचा मूर्ख! तिथे देखील उजव्या विंगेत कड्याच्या दिशेला न पळता उदेभानाच्या महालाच्या दिशेला पळाल्यामुळे डाव्या विंगेत उभ्या असलेल्या सोनावणे मास्तरांनी उजव्याहाताने माझ्या डाव्या गालफडावर एक सणसणीत 'डायरेक्शन' केलेले स्मरते. जीव बालमुठीत धरून मी पुन्हा एकदा तलवार आणि मावळी पागोटे सांभाळीत उजव्या विंगेत पळताना वाटेत आडव्या पडलेल्या तानाजीच्या छातीवर पाय देऊन पळालो होतो. असो; हे विषयांतर झाले. विनोदबुद्धीचा उगम माझ्या मानेवरील चामखिळीप्रमाणे केव्हा झाला हे अजिबात स्मरत नाही! -- (पु.ल.देशपांडे नसती उठाठेव.)

Wednesday, July 10, 2013

बोलक्या रेषा (Bolkya Resha)


समजत नाही कि मी घडलो कि बिघडलो

हुशारी मिळवताना शहाणपण विसरलो
तंत्रज्ञानामागे धावताना आत्मज्ञान विसरलो
पैसा हीच शक्ती समजून ईश्वरभक्ती विसरलो
समजत नाही की मी घडलो की बिघडलो

...
सुख शोधताना जीवनाचा बोध विसरलो
सुखासाठी साधने वापरताना साधना विसरलो
भौतिक वस्तूच्या सुखात नैतिकता विसरलो
समजत नाही की मी घडलो की बिघडलो

धन जमा करताना समाधान विसरलो
तंत्रज्ञान शोधताना ते वापरण्याचे भान विसरलो
परिक्षार्थी शिक्षणात हाताचे कौशल्य विसरलो
समजत नाही की मी घडलो की बिघडलो


टी.व्ही. आल्यापासून बोलणं विसरलो
जाहिरातीच्या मार्यामुळे चागलं निवडणं विसरलो
गाडी आल्यापासून चालणं विसरलो
समजत नाही की मी घडलो की बिघडलो

मोबाईल आल्यापासून भेटीगाठी विसरलो
कॅलक्युलेटर आल्यापासून बेरीज विसरलो
संगणकाच्या वापराने विचार करणं विसरलो
समजत नाही की मी घडलो की बिघडलो

संकरीत खाल्यामुळे पदार्थांची चव विसरलो
फास्टफूडच्या जमान्यात तृप्तीचे ढेकर विसरलो
.सी. मध्ये बसून झाडाचा गारवा विसरलो
समजत नाही की मी घडलो की बिघडलो

परफ्युमचा वापरामुळे फुलांचा सुगंध विसरलो
चातुर्य मिळवताना चरित्र विसरलो
जगाचा भूगोलात गावाचा इतिहास विसरलो
समजत नाही की मी घडलो की बिघडलो

बटबटीत प्रदर्शनात सौंदर्याचे दर्शन विसरलो
रिमिक्सच्या गोंगाटात सुगमसंगीत विसरलो
मृगजळामागे धावताना कर्तव्यातला आनंद विसरलो
समजत नाही की मी घडलो की बिघडलो

स्वतःमध्ये मग्न राहून दुस-‍याच्या विचार विसरलो
सतत धावताना क्षणभर थांबणं विसरलो
जागेपणी सुख मिळवताना सुखानं झोपणं विसरलो
समजत नाही की मी घडलो की बिघडलो.