Showing posts with label marathi poem. Show all posts
Showing posts with label marathi poem. Show all posts

Wednesday, July 22, 2015

एक गंमत सांगू तुला ?



एक गंमत सांगू तुला ???
लहानपणी चणे फ़ुटाणे खूप आवडायचे खायला..
पण दहा पैसेही परवडायचे नाहीत खिशाला..
म्हातारपणी रुपायांनी खिसा भरला
पण मोडके दात बघून चणे लागले चिडवायला...


एक गंमत सांगू तुला ???
लहानपणी वाटायचं, नविन पुस्तके हवीत वाचायला..
पण मित्रांची पुस्तके उसनी घेवून अभ्यास पूर्ण केला..
म्हातारपणी नवीन पुस्तकांचा ढीग येवून पडला
पण तो पर्यंत चष्म्याचा नंबर सोडावाँटर झाला...


एक गंमत सांगू तुला ????
लहानपणी रिक्षातून आवडायचे फ़िरायला
पण सव्वा रुपायासुध्दा नसायचा कनवटीला..
म्हातारपणी ड्रायव्हर म्हणतो गाडी तयार आहे, चला फ़िरायला 
पण जीना उतरेस्तवर
पाय लागतात लटपटायला...


एक गंमत सांगू तुला ????
लहानपणी 10✘10 ची खोली होती रहायला,
दमून भागून आलो की क्षणात लागायचो घोरायला..
म्हातारपणी चार खोल्यांचा मोठा ब्लाँक घेतला,
पण एकेक खोली आ वासून येते खायला...


एक गंमत सांगू तुला ????
खूप शिकून मुलगा अमेरिकेला गेला,
फ़ार फ़ार आनंद झाला पण भिती वाटते मनाला..
मृत्युसमयी येईल का तो पाणी द्यायला,
का ई-मेलवरच शोकसंदेश पाठवेल आपल्या आईला.

म्हणून म्हणतो मित्रांनो......आताच जगणं शिका...

Friday, February 13, 2015

याचा अर्थ तुम्ही मरताय. हळूहळू. Die Slowly by Pablo Neruda


तुम्ही प्रवासाला नाही जात,
भटकत नाही.
तुम्ही वाचतच नाही काही,
जगण्याच्या हाका पडतच नाहीत तुमच्या कानावर,
चुकून कधी नाही देत,
तुम्ही स्वत:च्याच पाठीवर शाबासकीची थाप.
याचा अर्थ, तुम्ही मरताय. हळूहळू.

स्वत:चं मन मारून,
तडजोड करून जगता तुम्ही.
मायेनं कुणी मदत करायला येतं,
तर ते ही नाकारता तुम्ही.
याचा अर्थ, तुम्ही मरताय. हळूहळू.

सवयीेंचे गुलाम बनता आहात तुम्ही,
रोज त्याच त्या मळक्या वाटेवर चालताय तुम्ही,
चुकून कधी नव्या रस्त्यानं जाऊन पाहत नाही,
चुकून कधी वाट चुकत नाही,
परक्या अनोळखी माणसांना भेटत नाही,
त्यांच्याशी काही बोलत नाही,
अंगावर चढवत नाही,
नवेकोरे पूर्वी न वापरलेले रंग.
याचा अर्थ, तुम्ही मरताय. हळूहळू.

छातीत धडधडतच नाही तुमच्या,
तुमचं पॅशन काय हेच आता आठवत नाही तुम्हाला,
भावनांचा अतिरेकी कल्लोळ नाही जाणवत आतल्या आत,
नाही तुटत पोटात,
नाहीच येत पाणी डोळ्यात.
याचा अर्थ, तुम्ही मरताय. हळूहळू.
या कामात मन रमत नाही,
असं वाटतं; 
तरीही तुम्ही चिकटून बसता त्याच नोकरीला.
नाही पटत ‘त्या’ व्यक्तीशी तरी, 
संपलंय प्रेम हे माहितीये तरी,
तुम्ही रेटत बसता ते नातं,
आयुष्य बदलण्याचा धोकाच नको म्हणता,
सोडत नाही चाकोरी,
झपाटून झोकून देत नाही स्वत:च्या स्वप्नांसाठी स्वत:ला,
तोलूनमापून सुरक्षित जगण्याचे सल्ले झुगारून देत,
एक संधीही देत नाही स्वत:ला,
स्वत:साठी जगण्याची.
आयुष्यच बदलून टाकण्याची.
याचा अर्थ तुम्ही मरताय.
हळूहळू.

- पाब्लो नेरुदा
नोबेल पारितोषिक विजेते सुप्रसिद्ध कवी

Don't know who translated this English poem in Marathi but its great work.
More about this Poet can be found at http://en.wikipedia.org/wiki/Pablo_Neruda
 

Thursday, June 5, 2014

तर समजावं... अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...

आजही पाकिटात कधीतरी दडवलेली
जुनी पाचशेची नोट सापडली आणि
मनापासुन आनंद झाला तर समजावं...
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...
घराबाहेर पडताना मोठ्यांच्या पाया
पडावसं वाटलं तर समजावं...
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...
भर पावसात बाईक थांबवून
रस्त्याशेजारच्या टपरीवरच्या गरमागरम
भज्यांचा आस्वाद घ्यावासा वाटला
तर समजावं...
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...
जुने, साधेसुधे शाळकरी मित्र
भेटल्यावर, त्यांना पूर्वीसारखी
कडकडून मिठी माराविशी वाटली
तर समजावं...
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...
साबणाची वडी चपटी होईपर्यंत
वापरता आली, टूथपेस्ट अजूनही
शेवटपर्यंत पिळता आली तर समजावं
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...
आईने किसलेल्या खोबर्याचा आणि
शेंगदाणा कुटाचा न लाजता बकाणा
भरता आला तर समजावं,
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...
संध्याकाळी सातच्या आत घरात
येऊन शुभंकरोती म्हणावसं वाटलं
की समजावं,
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...
तुमच्या गरीब मित्राने कर्ज काढून
घेतलेल्या बाईकचं,
घरगड्याने आठवडा बाजारातून घेतलेल्या शर्टाचं ,
आणि मध्यमवर्गीय शेजारणीच्या
पाचशेच्या साडीचं...
मनापासुन
कौतुक करता आलं की समजावं,
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...
चाळीतल्या दिवसांच्या,
विटीदांडूच्या-लगोरी-गोट्यांच्या
खेळांच्या आठवणीत मन रमू शकलं
तर समजावं,
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...
मुलीला बार्बी खरेदी करताना,
घराशेजारच्या बांधकामावर आईबाप
काम करत असलेल्या तिच्या
समवयस्क छोटीसाठीही एखादं खेळणं
आठवणीने खरेदी केलत तरी समजावं,
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...
इटालियन-मॅक्सिकन फुड खाताना,
बाबांच्या कमी पगारांच्या दिवसांतली
पोळीभाजी आठवली तरी समजावं,
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...
नवं समृद्ध आयुष्य जगताना, जुने कष्ट आठवले,
ज्यांनी आयुष्य घडवलं ती
मंडळी नुसती आठवली‍,
तरी समजावं...
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत....
जर मनापासून आवडे तर जरुर इतरांना पाठवा. ...

कवी : सचिन परांजपे

To View G+ Profile of Sachin Click Here

Wednesday, September 29, 2010

शाळेत असताना मीही एकदा पडलो होतो प्रेमात - प्रा.गुरुराज गर्दे Love in School Days (Marathi Poem)

"शाळेत असताना मीही एकदा पडलो होतो प्रेमात"


शाळेत असताना मीही एकदा पडलो होतो प्रेमात,
कळलच नाही,'काय बघीतलं होतं कुलकर्ण्यांच्या हेमात?'

कुलकर्ण्यांची हेमा म्हणजे शंभर नंबरी सोनं,
नाकावरती सोडावॉटर आणि मागे दोन वेण्या .
वारं आलं तर ऊडून जाईल अशी तीची काया,
रुपं पक्क काकूबाई...पण अभ्यासावर माया

गॅदरींगमध्ये एकदां तिने गायलं होतं गाणं,
तेव्हापासून तिच्या घरी वाढलं येणं जाणं.
नारळीपौर्णीमेला तिन मला नारळीभात वाढला,
हातात तिच्या राखी बघून मीच पळ काढला

नको त्या वयात प्रेम करायची माझी मस्ती जीरून गेली,
शाळेमधली प्रेम-कहाणी शाळेमध्येच विरुन गेली.
थोड्याच दिवसात वेगळं व्हायची वेळ आमच्यावर आली होती,
मित्रांकडून कळलं, हेमाच्या वडीलांची बदली झाली होती

पुलाखालून दरम्यानच्या काळात बरचं पाणी वाहून गेलं
पुढ हेमाचं काय झालं ?हे विचारायचच राहून गेलं
परवाच मला बाजारात अचानक हेमा दिसली
ओळखलचं नाही मी....म्हटल्यावर खुदकण गालात हसली.

आईशप्पथ सांगतो तुम्हाला तिच्यात काय सॉलीड बदल झाला होता,
चवळीच्या शेंगेला जणू आंब्याचा मोहोर आला होता
लग्नानंतर हेमा पाच वर्षात गरगरीत भरली होती
मागे उभ्या नवर्‍याने हातात भाजीची पिशवी धरली होती

सोडावॉटर जाऊन आता कॉन्टॅक्ट लेन्स आले होते,
कडेवर एक आणि हातामध्ये एक असे दोन प्रिन्स झाले होते.
मंगळसुत्र मिरवत म्हणाली, "हे आमचे हे"
बराच वेळ हात अवघडला जरा भाच्याला घे,

बरं झालं बरोबर मी माझ्या बायकोला नेलं होतं
माझ्या प्रेयसीनं नवर्‍यासमोर मलाच मामा केलं होतं
म्हणून आयुष्यात माणसाने कधी चुकू नये नेमात
शाळेत असताना मीही एकदा पडलो होतो प्रेमात

कवी- प्रा.गुरुराज गर्दे 

A nice marathi poem by Poet- Guruaj Darge on Love in School Days