Monday, July 27, 2015

गटारी - वेगवेगळ्या राशींचे नवरे आणि त्यांच्या बायकांच्या प्रतिक्रिया

गटारी - वेगवेगळ्या राशींचे नवरे आणि त्यांच्या बायकांच्या प्रतिक्रिया

आता लवकरच गटारी येईल.या गटारीची पार्टी करू असा मित्रांचा फोन आल्यावर वेगवेगळ्या राशींचे नवरे आणि त्यांच्या बायकांच्या प्रतिक्रिया बघा .....

मेष.. ..यांचा धडक बाणा
हे बघ बंडूचा फोन होता.आम्ही गटारी पार्टी करतोय.अडवण्याचा प्रयत्न करू नको...
बायको ....वृश्चिकेची चंडिका ...  मी कशाला अडवू?पण गटारात तोंड बुडवून आल्यावर अंघोळ करा म्हणजे झालं

वृषभ......अग बंडूचा फोन होता गटारी पार्टी आहे जाऊ ना?
कन्येची पत्नी.......म्हणजे तिथे सग्गळं होणार ना पिणं वगैरे.. ...
पति(वैतागून)हो आम्ही सगळे हाॅर्लिक्स पिणार आहोत

मिथून.....अग बंडूचा फोन....
मिथूनेचीच पत्नी....गटारी पार्टी ना??
खुशाल जा.पण उतरल्याशिवाय घरी येऊ नका

कर्क......अग त्या बंड्याने फोन करून बोलावलेयनाही म्हणणे ठीक नाही.काय करू?
पत्नि.....कर्केचीच.....नाईलाज आहे.पण जा पण तुम्ही पिऊ नका

सिंह. ..हे बघ बंडूचा फोन आलाय आणि आम्ही पार्टी करणार आहोत
पत्नी.....वृश्चिकेची...जा की मग दारू ढोसा वाट्टेल ते करा.पण तरंगत घरी आल्यावर मी दार उघडणार नाही


कन्या.... अगं बंडूकडे आम्ही पार्टी करतोय.
मिथुनेची चतुरा पत्नी....जा जा एक दिवस मजा करा
(असे तोंडाने म्हणताना नव-याची गाडीची किल्ली हळूच काढून घेते.

कुंभ.....गटारीला बंडूकडे मदिरा प्राशनाचा कार्यक्रम आहे
पत्नी....कुंभेचीच.....खुशाल जा या क्षणभंगूर जीवनातले असे आनंदाचे क्षण चुकवू नका

मीन.....अग ए गटारीला बंडूकडे पार्टी आहे जाऊ ना
वृषभेची पत्नी.....जा तर.पण परत येताना आपल्याच घरात या
गेल्या वेळेस किरकिरे काकूंच्या घराची बेल वाजवून गोंधळ उडवला होतात

तूळ...  बंडूकडे गटारी पार्टी आहे.मला बोलावलेय
मेषेची पत्नी... जा पण येताना भान ठेवा.गेल्यावर्षी बंडूभावजींचा लेंगा घालून घरी आलात बावळटासारखे

वृश्चिक......हे बघ बंडूकडे पार्टीला चाललोय
वेडपटासारखी सारखा फोन करू नको
तुळेची पत्नी....बरं तूम्हीच उतरल्यावर फोन करा

धनू......मूड नव्हता माझा पण ड्रींक्स पार्टीला नाही कसं म्हणणार
सिंहेची पत्नी ....काहीही करा तुम्हाला घाणीत तोंड बुडवायचेच असेल तर मी काय करणार??

मकर.......बंडू अतिशय दुःखी आहे म्हणून आम्ही जमतोय
मिथुनेची पत्नी....ढोसून दुःख हलकं करून झालं की या घरी  मग पूजा करते तुमची!!


Wednesday, July 22, 2015

एक गंमत सांगू तुला ?



एक गंमत सांगू तुला ???
लहानपणी चणे फ़ुटाणे खूप आवडायचे खायला..
पण दहा पैसेही परवडायचे नाहीत खिशाला..
म्हातारपणी रुपायांनी खिसा भरला
पण मोडके दात बघून चणे लागले चिडवायला...


एक गंमत सांगू तुला ???
लहानपणी वाटायचं, नविन पुस्तके हवीत वाचायला..
पण मित्रांची पुस्तके उसनी घेवून अभ्यास पूर्ण केला..
म्हातारपणी नवीन पुस्तकांचा ढीग येवून पडला
पण तो पर्यंत चष्म्याचा नंबर सोडावाँटर झाला...


एक गंमत सांगू तुला ????
लहानपणी रिक्षातून आवडायचे फ़िरायला
पण सव्वा रुपायासुध्दा नसायचा कनवटीला..
म्हातारपणी ड्रायव्हर म्हणतो गाडी तयार आहे, चला फ़िरायला 
पण जीना उतरेस्तवर
पाय लागतात लटपटायला...


एक गंमत सांगू तुला ????
लहानपणी 10✘10 ची खोली होती रहायला,
दमून भागून आलो की क्षणात लागायचो घोरायला..
म्हातारपणी चार खोल्यांचा मोठा ब्लाँक घेतला,
पण एकेक खोली आ वासून येते खायला...


एक गंमत सांगू तुला ????
खूप शिकून मुलगा अमेरिकेला गेला,
फ़ार फ़ार आनंद झाला पण भिती वाटते मनाला..
मृत्युसमयी येईल का तो पाणी द्यायला,
का ई-मेलवरच शोकसंदेश पाठवेल आपल्या आईला.

म्हणून म्हणतो मित्रांनो......आताच जगणं शिका...

Sunday, July 19, 2015

"पदर" ! मराठीतला जादुई शब्द

"पदर" !

काय जादुई शब्द आहे हो मराठीतला !
काना नाही, मात्रा नाही, वेलांटी
नाही, अनुस्वार नाही. एक 
सरळ तीन अक्षरी शब्द. पण,
केवढं विश्‍व सामावलेलं आहे 
त्यात!

किती अर्थ, किती महत्त्व... 
काय आहे हा पदर?

साडी नेसणाऱ्या स्त्रीच्या
खांद्यावर रुळणारा मीटर दीड
मीटर लांबीचा भाग. तो 
स्त्रीच्या लज्जेचं रक्षण तर
करतोच, सगळ्यात महत्त्वाचं 
हे कामच त्याचं. पण, आणखी
ही बरीच कर्तव्यं पार पाडत असतो हा !

या पदराचा उपयोग स्त्री केव्हा,
कसा अन्‌ कशासाठी करेल, 
ते सांगताच येत नाही.

सौंदर्य खुलवण्यासाठी सुंदरसा
पदर असलेली साडी निवडते. सण-समारंभात तर छान-छान
पदरांची जणू स्पर्धाच लागलेली
असते. सगळ्या जणींमध्ये 
चर्चाही तीच.

लहान मूल आणि आईचा पदर, 
हे अजब नातं आहे. मूल तान्हं
असताना आईच्या पदराखाली
जाऊन अमृत प्राशन
करण्याचा हक्क बजावतं.

जरा मोठं झालं, वरण-भात 
खाऊ लागलं, की त्याचं 
तोंड पुसायला आई पटकन 
तिचा पदरच पुढं करते.

मूल अजून मोठं झालं, शाळेत
जाऊ लागलं, की रस्त्यानं 
चालताना आईच्या पदराचाच 
आधार लागतो.  एवढंच काय,
जेवण झाल्यावर हात धुतला, 
की टॉवेलऐवजी आईचा 
पदरच शोधतं आणि आईलाही
या गोष्टी हव्याहव्याशा वाटतात
मुलानं पदराला नाक जरी 
पुसलं, तरी ती रागावत नाही 
त्याला...

बाबा जर रागावले, ओरडले 
तर मुलांना पटकन लपायला आईचा पदरच सापडतो.

महाराष्ट्रात तो डाव्या खांद्या
वरून मागे सोडला जातो; 
तर गुजरात, मध्य प्रदेशात 
उजव्या खांद्यावरून पुढं 
मोराच्या पिसाऱ्यासारखा
फुलतो !

काही कुटुंबात मोठ्या 
माणसांचा मान राखण्यासाठी
सुना पदरानं चेहरा झाकून
घेतात, तर काही जणी आपला
लटका, राग दर्शवण्यासाठी 
मोठ्या फणकाऱ्यानं पदरच झटकतात !

सौभाग्यवतीची ओटी भरायची
ती पदरातच अन्‌ संक्रांतीचं 

वाण लुटायचं ते पदर लावूनच.
बाहेर जाताना उन्हाची दाहकता
थांबवण्यासाठी पदरच 
डोक्‍यावर ओढला जातो, 
तर थंडीत अंगभर पदर लपेटल्यावरच छान ऊब 
मिळते! 
काही गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी
पदरालाच गाठ बांधली जाते 
अन्‌ नव्या नवरीच्या जन्माची 
गाठ ही नवरीच्या पदरालाच, 
नवरदेवाच्या उपरण्यासोबत 
बांधली जाते.

पदर हा शब्द किती अर्थांनी 
वापरला जातो ना? 
नवी नवरी नवऱ्याशी बोलताना 
पदराशी चाळे करते, पण 
कामाचा धबडगा दिसला, 
की पदर खोचून कामाला
लागते. 
देवापुढं आपण चुका कबूल करताना म्हणतोच ना - माझ्या
चुका "पदरात घे.‘

मुलगी मोठी झाली, की आई
तिला साडी नेसायला शिकवते,
पदर सावरायला शिकवते अन्‌
काय म्हणते अगं, चालताना 
तू पडलीस तरी चालेल. 
पण, "पदर" पडू देऊ नकोस ! अशी आपली संस्कृती.

या पदरावरूनच किती तरी वाक्‌प्रचार, म्हणी रूढ झाल्या आहेत.
पदर सुटला म्हटले, की 
फजिती झाली; कुणी पदर 
ओढला म्हटलं, की छेड
काढली.

"पदरावरती जरतारीचा मोर
नाचरा हवा, आई मला नेसव 
शालू नवा...‘ अशी गाणी ऐकायलाही छान वाटतात.

असा हा किमयागार पदर

लेखक: अनामिक 
WhatsApp वर वाचनात आले आणि आवडले म्हणून शेअर केले आहे . लेखकाचे नाव कळल्यास श्रेय देण्यात येईल.

Friday, July 17, 2015

तुला माझ्याबद्दल काय वाटतं ?


लग्नाला बारा वर्ष झाल्यावर
अचानक एक दिवस तिनं त्याला विचारलं ..
."तुला माझ्याबद्दल काय वाटतं ?"
तो बावचळला ... गोंधळला ...
आता अशा प्रश्नांची सवय उरली नव्हती नं ... !
प्रेम नवं नवं होतं तेव्हा ठीक होतं हो ...
तिच्याकडून दिवसातनं एकदा तरी
हा प्रश्न यायचाआणि त्याच्याकडे ही
एकदम भारी भारी उत्तरं तयार असायची ..
.पण मग लग्न झालं ..
.संसार नावाची प्रश्नपत्रिका सोडवता
सोडवता ही असली तोंडी परीक्षा
पार विस्मरणात गेली ...
आणि काल परवा अचानक हा
गुगली पडला ...
त्यातून तिनं प्रश्न विचारला तेव्हा
ती पोळ्या करत होती ..हातात लाटणं ...
समोर तापलेला तवा ...
त्यानं संभाव्य धोका ओळखला ..
आणि 'सांगण्यासारखं प्रचंड आहे .
.संध्याकाळी सावकाशीनं सांगतो ...'
असं म्हणून तो कामावर सटकला ... !
तो घरातून बाहेर पडला खरा ...
पण घर काही डोक्यातून बाहेर
पडलं नव्हतं .. !
अख्खा दिवस शब्दांची जुळवा
जुळव करण्यात गेला ...
कठीण असतं हो ...
नात्याचं गणित एकदा भावनेत अडकलं
की ते शब्दांतून सोडवणं कठीण असतं ..
तो विचार करत होता ..काय सांगावं .. ?
मी राजा .. तू माझी राणी
वगैरे काही म्हणावं का ...नको ..
फार फिल्मी वाटतं ..तू खूप छान आहेस ..
.असं म्हणावं ... नको ...
तिला ते फारच रुक्ष वाटण्याची
शक्यता आहे .
.समजूतदार सहनशील वगैरे म्हणावं ...
तर ती नक्की म्हणेल ..
.राजकारण्यां सारखी उत्तरं देऊ नकोस ...
त्याला काहीच सुचेना ...
बायकोला आवडेल असं वागणं
आणि तिला पटेल असं बोलणं ...
हे दोन्ही शिकवणारे क्लासेस
असायला हवे ...
लाईन लागेल नवऱ्यांची ..
.त्याच्या मनात असले भलभलते
विचार येत होते ..सूर्य मावळला ...
घरी जायची वेळ झाली ..
आपल्याला पाहिल्या पाहिल्या तिच्या
उजव्या डोळ्याची भुवई वर जाणार ...
याची त्याला खात्री होती ...
घरचा अभ्यास न करता शाळेत गेलेल्या
विद्यार्थ्या सारखा त्याचा चेहरा झाला होता ...
त्यानं बेल वाजवली ..
अपेक्षे प्रमाणे तिनं दार उघडलंच नाही ..
त्याच्या मुलानं दार उघडलं ...आणि
पुढच्याच क्षणी कांद्याच्या भजीचा
घमघमाट नाकात शिरला ...
मुलगा जवळ जवळ उडी मारत म्हणाला ...
"भजी केलीत आईनं ... पटकन हातपाय
धुवून या ..."
तो मान डोलावून आत गेला ...आणि
पुढच्याच क्षणी टेबलवर हजर झाला ...
बायकोनं भज्यांची प्लेट समोर मांडली ..
त्यानं विलक्षण अपराधी चेहऱ्यानं
तिच्याकडे पाहिलं ...
तिनं तोंडभर हसून विचारलं ..
"काही सुचलं ... ?
"त्यानं नकारार्थी मान हलवली ...
तशी ती पटकन टाळी वाजवून
आनंदानं म्हणाली ...
"मलाही नाही सुचलं ... !
"तो पुन्हा गोंधळला ...इतकी
अनपेक्षित प्रतिक्रिया ... ?
आणि ती बोलतच होती ...
"काही दिवसांपूर्वी माझ्या एका मैत्रिणीनं
मला विचारलं ...
तुला तुझ्या नवऱ्याबद्दल काय वाटतं ... ?
"सात दिवस विचार केला ..पण
मला काही सांगताच येईना ..
.मग भीति वाटली ...
माझं तुझ्यावरचं प्रेम आटलं की काय .. ?
अपराधी वाटायला लागलं -
काय करावं कळेना ...
मला स्वतः विषयी शंका होती
पण बारा वर्षानंतर ही तुझं प्रेम
कणभर ही आटलेलं नाही याची
खात्री होती.
म्हणून मग हा प्रश्न तुला विचारला ..
.वाटलं ..तुला उत्तर देता आलं तर
आपण 'Fault' मध्ये आहोत ..
पण नाही ... तुलाही उत्तर देता
आलं नाही ...म्हणजे आपण आता
अशा वळणावर आहोत ...
जिथे फक्त 'वाटणं' संपून 'वाटून घेणं'
सुरु झालंय ..
.आता शब्द सापडत नाहीत ...
आणि त्याची गरजही वाटत नाही ...
कारण आता एकमेकांसमोर स्वतःला
सिध्द करण्याची धडपड संपलीय ...
"असं म्हणून तिनं एक कांदा भजी
त्याला भरवली ...""
त्याच्या बारा वर्षाच्या संसारा मधला
सगळा खमंगपणा त्या भजीत उतरला होत...!!!


लेखक: अनामिक
WhatsApp वर वाचनात आले आणि आवडले म्हणून शेअर केले आहे . लेखकाचेचे नाव कळल्यास श्रेय देण्यात येईल.

Wednesday, July 8, 2015

गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो

गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो
तिच्या एका “झलके” साठी बोळ बोळ फिरायचो,
ती दिसायची नाही पण तिचा बाप बाहेर यायचा,
त्याला कळू नये म्हणून मग “झाल का जेवण” विचारायचो
गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो

शेवटच्या बाकड्यावर बसून तीला बघत असायचो,
ती कधी तरी पहायची मग विचारात गुंतत रहायचो,
हिला आता विचारूच म्हणत तिच्या मागे फिरायचो,
चिंचा, आवळे, बोरं तिला कुरणात जावून आणायचो
गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो

यात्रे दिवशी तेवढ देवाला निवद घेवून जायचो,
नदीवरच्या पुलावर तिची वाट पहात असायचो,
ती यावी म्हणू आधीच देवाला नवस बोललेलो असायचो,
ती आल्यावर मात्र नारळ फोडून देवाचा नवस मग फेडायचो
गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो

धुणं धूया ती जेव्हा नदीकाठी यायची,
कमरेवर बादली आणि मैत्रीण सोबत असायची,
आम्ही मात्र चड्डीवर पाण्यात उड्या मारायचो,
मग खेकड्यावानी कपारीला लपून तिला पाहायचो
गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो

तिच्या मैत्रिणीच्या लग्नात आवर्जून जायचो,
नवरा भावबंद असल्यासारख घोड्यासमोर नाचायचो,
तिनं बघाव म्हणून जोरात उड्या मारायचो,
ती हसलेली बघून आनंदात न जेवताच घरी यायचो
गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो

मग कधी तिला मुलगा पाहायला यायचा,
आम्ही तेव्हा मात्र पांदीला गुरामाग असायचो,
बघून देखून गेल्यावर आम्हाला बातमी ती कळायची,
मग आपल रात्री नुकताच विचार करत झोपायचो,
गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो

शेवटी तिच्या लग्नाची पत्रिका घरी यायची,
आम्ही ती तेव्हा मात्र निरखून वाचायचो,
कार्यवाहकाच्या यादीत तेव्हा आम्ही असायचो,
तीच लग्न तेव्हा जबाबदारीन पार पाडायचो,
गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो

तिच्या लग्नात लाडू खाल्यावर आम्ही घरी परत यायचो,
रानामधी जावून सरीच्या अंकुराशी बोलायचो,
दोन तीन दिवस न जेवताच गावात फिरत रहायचो,
मनामधी तेव्हा खरच फार रडायचो,
गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो

ती सोळाव्याला आली की तिला जावून भेटायचो,
कस आहे सासर सारी विचारपूस करायचो,
नकळत तेव्हा तिच्या डोळ्यात येणारे हळुवार पाणी पाहायचो,
आणि मग तेव्हा तिच्या मनातल प्रेम आम्ही समजायचो,
गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो


कवी : Mr. Sagar Kakade. ९९६०४५५५२२
कविता WhatsApp वर वाचनात आली. आवडली म्हणून शेअर केली. कवीचे नाव कळल्यास श्रेय देण्यात येईल.